
राज्यात 1 लाख 82 हजार 443 कुपोषित बालके आढळली असून त्यापैकी 30 हजार 800 बालके गंभीर तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत असून 1 लाख 51 हजार 643 बालके मध्यम कुपोषित श्रेणीत असल्याचे राज्य सरकारने आज विधानसभेत लेखी उत्तरात मान्य केले. राज्यात सर्वाधिक तीव्र कुपोषित बालके (2 हजार 778) मुंबईच्या उपनगरात असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे.
राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उपाययोजनांबाबत काँग्रेसचे सदस्य विकास ठाकरे व अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात महिला व बाल विकास विभागाने कुपोषित बालकांची आकडेवारी दिली.
अंगणवाडी सेविकांची पदे रिक्त
राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसांची सुमारे 3 हजार 602 पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिकांचीही पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे. पोषण श्रेणीनुसार मुंबई महानगरपालिकेने 6 हजार 92 बालकांच्या पोषण श्रेणीची नोंदच केली नसल्याचे व सर्वाधिक कुपोषित बालके मुंबईच्या उपनगरात असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरील लेखी उत्तरात महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी अंशतः खरे आहे, असे मान्य केले आहे.
जिल्हा मध्यमकुपोषित तीव्र कुपोषित
मुंबई उपनगर 13 हजार 457 2 हजार 887
ठाणे 7 हजार 366 444
नाशिक 8 हजार 944 1 हजार 852
पुणे 7 हजार 410 1 हजार 666
धुळे 6 हजार 377 1 हजार 741
संभाजीनगर 6 हजार 487 1 हजार 439
नागपूर 6 हजार 715 1 हजार 373































































