
बोरिवली येथील एका क्लासकडून विद्यार्थ्यांना क्लासच्या फीसाठी त्रास दिला जात होता. काही जणांकडून क्लासची फीसुद्धा वसूल करण्यात आली होती. याबाबतची तक्रार बोरिवलीतील शाखा क्रमांक 3 कडे आल्यानंतर तत्काळ याची दखल घेऊन शिवसेना पदाधिकाऱयांनी क्लासवर हल्लाबोल करत क्लास चालकाला धारेवर धरले. क्लास चालकाने आपली चूक मान्य करत विद्यार्थ्यांची फी परत केली.
बोरिवली पश्चिम येथील गोयल शॉपिंग सेंटरमधील डीआयसीई कोचिंग क्लासेसमध्ये कॉलेजच्या मुलांना फीवरून खूप त्रास दिला जात होता. विद्यार्थ्यांनी याबाबतची तक्रार शाखा क्रमांक 3 मध्ये विधानसभा संघटक रोशनी गायकवाड यांच्याकडे केली. या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन रोशनी गायकवाड यांच्यासह माजी संपर्क प्रमुख उमेश गायकवाड, बोरिवलीचे शाखाप्रमुख एडविन बंगेरा, उपविधानसभा संघटक विकास चव्हाण, शाखाप्रमुख बापूसाहेब गेजगे, शाखा समन्वयक संजय दुबे, शाखा संघटक हेमलता मयेकर, विधानसभा संघटक बंगेरा, योगेश कवठे या सर्व पदाधिकाऱयांनी क्लासमध्ये धडक दिली आणि क्लास चालकाला धारेवर धरले. यावेळी विद्यार्थी आणि पालकही उपस्थित होते. क्लासचालकाने आपली चूक कबूल करत विद्यार्थ्यांचे फीचे पैसे परत मिळवून दिले. दिलासा दिल्याबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी शिवसेनेचे आभार मानले.