
देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभपर्वावर मराठवाड्यासाठी आनंदवार्ता आहे. पावसाळ्याच्या पूर्वार्धातच जायकवाडी धरण अर्धे भरले असून, वापरायोग्य पाणीसाठा 50 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. सध्या नाथसागर जलाशयात 16 हजार 295 क्युसेस प्रमाणे नवीन पाण्याची आवक होत असून, गेल्या वर्षी आजच्याच तारखेला प्रकल्पात केवळ 4 टक्के जलसाठा शिल्लक होता हे विशेष !
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 20 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व 9 धरणांमध्ये पुरेपूर पाणीसाठा झाला आहे. अनेक धरणांनी जलविसर्ग सुरू केलेला आहे. गोदावरी नदीच्या पात्रातूनही पाणी वाहत आहे. या पार्श्वभूमीवर 20 मार्चपासून नाथसागर जलाशयात पाणी येण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे 29 टक्के असलेल्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत गेली. बाष्पीभवनाचा वेगही मंदावला असून, पाण्याची आवक कमी अधिक असली तरी जलसाठ्यात 17 दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे, अशी माहिती दगडी धरण उपविभागीय शाखा अभियंता गणेश खरडकर यांनी दिली. आज 6 रोजी दुपारी 12 वाजता धरणाच्या पाणीपातळी मापक यंत्रावर 1511 फूट पाणीपातळीची नोंद झाली आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 1522 पाणीपातळीची आवश्यकता आहे. धरणात असलेल्या एकूण 1825.923 दशलक्ष घनमीटर पाण्यापैकी वापरायोग्य पाणीसाठा 1087 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. वापरायोग्य पाणीसाठा 50.11 टक्के असून, सध्या धरणात 16 हजार 295 क्युसेस याप्रमाणे नव्याने जलौघ दाखल होत आहे. त्यामुळे पाणीपातळी वाढण्याचे सातत्य कायम राहणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या दगडी धरण उपविभागीय अभियंत्या श्रद्धा निंबाळकर यांनी दिली.