ते वेडे झालेत, त्यांना भाषासंघर्ष घडवायचा आहे; संजय राऊत यांचा घणाघात

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मराठी विजयोत्सवावर केलेल्या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. ”लखनौ पेक्षा जास्त हिंदी मुंबईत बोलली जाते. इथे हिंदी चित्रपट, गाणी, नाटकं चालतात. पुस्तक वाचली जातात. हे भाजपवाले वेडे झाले आहेत. त्यांना महाराष्ट्रात सत्तासंघर्ष घडवायचा आहे’, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला.

”आशिष शेलार म्हणतात पहलगाममध्ये लोकांचा धर्म विचारून मारलं गेलं तसं महाराष्ट्रात भाषा विचारून मारले जातेय. काही लोकांना महाराष्ट्राची संस्कृती मान्य नाही, त्याविषयी विचारल्यावर त्यांना राग येतोय. त्यांच्या या वागण्याचा राग मंत्र्यांना देखील यायला हवा. मराठी भाषा महाराष्ट्रात नाही राहणार तर काय पाकिस्तानात राहाणार का? हा सरळ सरळ भाषेचा अपमान आहे. अतिरेक्यांसोबत तुलना होणं हे अत्यंत चकीचे असून ही भाजपची मानसिकता आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

”आम्ही कुणालाही मारलं नाही, भाजपवाले चुकीचे पसरवत आहेत. जे मराठी भाषा व महाराष्ट्राविरोधात बोलत आहेत त्यांच्याविरोधात आम्ही आहोत. जर उत्तर प्रदेशमध्ये हिंदीविरोधात काही बोलले तर तिथली लोकं आंदोलन करणारच ना. लखनौ पेक्षा जास्त हिंदी मुंबईत चालते. इथे हिंदी थिएटर, संगीत चाललं नसतं. आम्ही हिंदीत बोलतो. हे जे भाजपचे पागल लोकं आहेत ते वेडे झालेयत. यांना महाराष्ट्रात भाषासंघर्ष घडवायचा आहे. महाराष्ट्र हे राज्य लिंग्विस्टिक स्टेट आहे. हे त्रिभाषा सूत्र जे भाजपवाले इथे लागू करतायत ते जर त्यांना उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये लागू करायचे असेल तर तिसरी भाषा कोणती असेल? मराठी, तमिळ, बंगाली कोणती भाषा लागू करणार. हे आधी सांगा नंतर आमच्यावर प्रश्न करा, असेही संजय राऊत यांनी भाजपवाल्यांना सुनावलं आहे.