योगी आदित्यनाथांनी विद्यार्थीनीला दिलं फी माफीचं आश्वासन, शाळेने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली

सातवीत शिकणाऱ्या पंखुरी त्रिपाठी या विद्यार्थीला घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे फी न भरल्यामुळे शाळेत जाता येत नव्हते. त्यामुळे तिने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली व मदतीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी तिला चॉकलेट देत फी माफीचं आश्वासन दिलं. मात्र प्रत्यक्षात जेव्हा पंखुरी तिच्या आजारी वडिलांना घेऊन शाळेत गेली तेव्हा त्यांना तिथे शाळेने त्यांना फी माफ करणार नाही असे सांगितले. तसेच अपमानास्पद वागणूक दिली.

पंखुरीचे वडील राजीव कुमार त्रिपाठी यांचा गेल्या वर्षी अपघात झाला होता. त्यात राजीव यांच्या पायाला गंभीर दुखापत झालेली. त्यामुळे त्यांचा जॉब सुटला. राजीव हे घरात एकटे कमावणारे होते. त्यामुळे त्यानंतर पंखुरीच्या घराची आर्थिक घडी विस्कटली. पंखुरीची शाळेची फी ही दरमहिना सोळाशे रुपये आहे. मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे गेले काही महिने तिला फी भरता आली नव्हती. त्यामुळे फेब्रुवारीपासून पंखुरी शाळेत गेली नव्हती. अखेर तिच्या वडिलांनी यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागायचे ठरवले. त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारमध्ये जाऊन आपली परिस्थिती सांगितली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिला चॉकलेट देऊन तिची फी माफ केली जाईल असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर पंखुरी तिच्या वडीलांना घेऊन शाळेत गेली. मात्र तिथे त्यांना शाळेच्या प्रशासनाकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. शाळेने त्यांना कुठल्याही प्रकारे फी माफी दिली जाणार नसल्याचे सांगितले. ”ते म्हणाले की जर असे प्रत्येक पालक मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि फी माफी करून आणली तर आम्ही शाळा कशी चालवायची. आम्हाला शिक्षकांना पगार द्यायचा असतो. त्यांनी माझ्या वडिलांचा देखील अपमान केला. ते सर्व बघून माझे वडील रडायला लागले. इतक्या वर्षाच्या नोकरीत कुणीही त्यांच्यासोबत अशा प्रकारे बोलले नव्हते, असे पंखुरीने सांगितले.