छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणाऱ्याला जिथल्या तिथे ठोकलं पाहिजे – उद्धव ठाकरे

मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी हिंदी भाषा सक्तीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ”छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या मग ते काय मूर्ख होते का?, असा प्रश्न त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. त्यांच्या या वक्तव्याविषयी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे आमदाराचा समचार घेतला.

”छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल जो कुणी बोलत असेल, मग तो कुणीही असो त्याला तिथल्या तिथे ठोकलं पाहिजे”, अशा एका वाक्यात उद्धव ठाकरे यांनी संजय गायकवाड यांच्यावर टीका केली.

उत्तरेत कोणती तिसरी भाषा आणणार

”आम्ही कोणत्या भाषेचा विरोध करत नाही, पण आमच्यावर जे लादलं जातंय त्याचा आम्ही विरोध करतोय. जर हे महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र राबवत असतील तर हे उत्तरेतील राज्यांमध्ये कोणती तिसरी भाषा लागू करणार ते यांनी सांगाव, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

निशिकांत दुबे… लकडबग्घा….

निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना, लकडबग्घा आहेत हे. आम्ही गुण्या गोविंदाने एकत्र राहतोय तरी आमच्यात आग लावतायत. यांना मी सांगतोय, की तुम्हाला इथे कुणी ओळखत नाही त्यामुळे तुम्ही तुमचे काम करा. खरंतर लकडबग्घाची मी माफी मागतो. कारण ही लोकं त्याही लायकीची नाहीत. त्यांनी इकडे येऊन बघावं आमचा कोणत्या भाषेला विरोध नाही, आमचा भाषेच्या सक्तीला विरोध आहे. शिवसेना, शिवसैनिक हे नेहमी रक्तदान शिबीर, अॅम्ब्युलन्स सेवा, इतर कुठल्याही सेवेत जात पात न बघता मदत करायला पुढे असतात. त्यामुळे या आग लावणाऱ्या लोकांनी आपला मेलेला पक्ष जिवंत होतोय का ते बघावं, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले

प्रसारमाध्यमांचे मानले आभार

”सर्व माध्यमांना मी धन्यवाद देतोय की त्यांनी परवा महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा आनंदाचा क्षण चांगल्या पद्धतीने सर्वांसमोर आणला. माध्यमांमध्येही त्यामुळे आनंद झाला. तुम्ही पाठिंबा दिला, ज्येष्ठांनी आशिर्वाद दिले. त्यासाठी धन्यवाद देतो. तमाम मराठी जणांना मुंबई व महाराष्ट्रामध्ये इतर भाषिक जे गुण्या गोविंदाने नांदतायत त्यांनी देखील कौतुक केले. त्यांचेही धन्यवाद, असे उद्धव ठाकरे म्हणाले.