
हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर झालेल्या संघर्षाने कसोटी क्रिकेटची प्रतिमा आणखी उंचावलीय. हिंदुस्थानने सामना गमावतानाही शेवटच्या क्षणापर्यंत दिलेला लढा सर्वांच्या हृदयात घर करून राहिलाय. कागदावर इंग्लंड जिंकलं असलं तरी कसोटी क्रिकेट जिंकलेय. या थरारक पराभवानंतर हिंदुस्थानी सलामीवीर के. एल. राहुलची प्रतिक्रियाही सर्वांनी भावलीय. काही सामने हे विजय आणि पराजयापेक्षा मोठे असतात, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर अवघ्या विश्वातून हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींनी त्याला आपला पाठिंबा दर्शवत ‘मँचेस्टरवर बरोबरी साधणारी कामगिरी करून दाखव,’ असे प्रोत्साहन दिलेय.
राहुलच्या पहिल्या डावातील शतकी खेळीने हिंदुस्थानला आघाडी मिळवून देण्याचे प्रयत्न केले होते. तसेच दुसऱ्या डावात तो 39 धावांवर बाद झाला आणि प्रंटफूटवर असलेला हिंदुस्थान बॅकफूटवर गेला. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज यांनी रवींद्र जाडेजाच्या साथीने केलेल्या झुंजार खेळामुळे हिंदुस्थानने अवघ्या जगाला कसोटी क्रिकेटचा अनोखा थरार अनुभवण्याची संधी दिली. हिंदुस्थान विजयासमीप पोहोचल्यावर बाद झाला आणि यजमान इंग्लंडने लॉर्ड्सवरची लढाई जिंकली. या पराभवाचे दुःख साऱयांनाच झाले. काहींनी हिंदुस्थानच्या संघर्षाला शाबासकी दिली, तर काहींनी मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशाचा खरपूस समाचार घेतला. हातातोंडाशी आलेल्या विजयाचा घास हिरावल्यामुळे हिंदुस्थानी संघही निःशब्द झाला होता. पराभवानंतर काय बोलावे कळत नव्हते, पण राहुलने पराभवाच्या दोन दिवसांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘काही सामने हे विजय आणि पराभवापेक्षा मोठे असतात. ते तुमच्या जिद्दीची आणि प्रतिभेची-चारित्र्याची परीक्षा घेतात आणि अशा सामन्यांमधून मिळणारा धडा हा तुम्हाला आणखी बळकट बनवतो,’ अशी पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनीही त्याला भरभरून दाद देत आपल्याही भावना व्यक्त केल्या आहेत. हिंदुस्थानने मैदानात गमावलेली लढाई आपल्या तळाच्या फलंदाजांच्या संघर्षाने जिंकली होती. आपला संघ मनाने जिंकला असल्याची भावना व्यक्त करत राहुलने मँचेस्टरमध्ये आपला संघ पुन्हा जोशात उतरण्यासाठी सज्ज असल्याचे न बोलताच सांगितले आहे.