ताण वाढला, मोटरमनना हृदयविकाराचे झटके; त्रासदायी शेड्युल नकोसे… स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज वाढले

>> मंगेश मोरे

‘मुंबईची जीवनवाहिनी’ अर्थात लोकल ट्रेनचे सारथ्य हाती असलेल्या मोटरमनचेच ‘जीवन’ धोक्यात आहे. वर्षभरात एकही साप्ताहिक सुट्टी नसलेल्या मोटरमनना कामाचा ताण असह्य झाला आहे. अनेक मोटरमन हृदयविकाराचे झटके तसेच इतर आजारांनी त्रस्त आहेत. कामाच्या त्रासदायी शेडय़ुलला वैतागलेले मोटरमन आता स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करू लागले आहेत. रेल्वे प्रशासन जर मोटरमनच्या प्रकृतीचा विचार करीत नसेल तर लोकल प्रवाशांबाबत काय गांभीर्य दाखवणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज सरासरी 30 लाख लोक प्रवास करतात. वाढत्या प्रवासी संख्येमुळे सध्या पश्चिम रेल्वे 1406 लोकल फेऱया चालवते. त्यात 109 एसी लोकल आणि 15 डब्यांच्या 211 लोकलचा समावेश आहे. या लोकल ट्रेनचे सारथ्य 1100 मोटरमनच्या हाती आहे. त्यातही मोटरमनचे 10 टक्के मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे उर्वरित मोटरमन अहोरात्र सेवेत राहून लोकलसेवा अखंडित सुरू ठेवत आहेत. रात्री डय़ुटी केल्यानंतर केवळ पाच तासांचा ब्रेक घेऊन पुन्हा पहाटेची ट्रेन चालवावी लागत आहे. विश्रांती कक्षात पुरेशा सुविधा नसल्याने धड झोप घेता येत नसल्याची नाराजी मोटरमन व्यक्त करीत आहेत. मोटरमनची मुख्य लॉबी असलेल्या चर्चगेट स्थानकातही विश्रांतीसाठी जागा नाही. लोकलच्या दोन फेऱयांमध्ये केवळ 40 मिनिटे विश्रांतीसाठी वेळ दिला जातो. अनेक लोकल ट्रेनना 15 ते 20 मिनिटे उशीर होतो. त्यामुळे 40 मिनिटांचा वेळ 20 मिनिटांपर्यंत कमी होतो. या कमी वेळेत नाश्ता करणेही शक्य होत नाही, असे एका मोटरमनने सांगितले. रोजच्या त्रासदायी शेडय़ुलमुळे मोटरमनना हृदयाशी संबंधित विकार तसेच अन्य आजारपणांचा सामना करावा लागत आहे. कामाचा ताण असह्य झाल्याने 7 ते 8 मोटरमननी स्वेच्छानिवृत्तीसाठी रेल्वेकडे अर्ज केले आहेत. आधीच मनुष्यबळ कमी असल्यामुळे रेल्वेने ते अर्ज प्रलंबित ठेवले आहेत. तसेच चार महिन्यांत चार मोटरमनना आजारपणामुळे दुसऱ्या विभागात हलवण्यात आल्याचे समजते.

  • प्रशासनाने मोटरमनवरील कामाचा ताण कमी करावा आमच्यावर लाखो मुंबईकरांची जबाबदारी असते. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी मोटरमनकडून केली जात आहे.
  • चर्चगेट स्थानकातील बंद केलेल्या विश्रांतीगृहाच्या बाजूला असलेल्या जागा रेल्वे प्रशासनाने भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. त्याठिकाणी खाद्यपदार्थ विकले जात असून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळत आहे. मात्र मोटरमनचे विश्रांतीगृह / कॅण्टीन आगीच्या धोक्याचे कारण देऊन बंद केले आहे. ही जागादेखील भाडे कमावण्यासाठी खासगी पंत्राटदारांच्या घशात घालण्याचे रेल्वेचे कारस्थान आहे का, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

पहाटे डय़ुटी असणाऱया मोटरमनना 3 वाजून 50 मिनिटांपूर्वी हजेरी लावावी लागते. सकाळची ही डय़ुटी करण्यासाठी घराबाहेर पडणारे मोटरमन सकाळी डबा घेऊन येत नाहीत. त्यांच्यासाठी चर्चगेट स्थानकात कॅण्टीनचीही व्यवस्था नाही. त्यामुळे उपाशीपोटी लोकल ट्रेन चालवावी लागत आहे. परिणामी, विविध व्याधींना निमंत्रण मिळत असल्याचे काही मोटरमननी सांगितले.

चर्चगेटचे विश्रांतीगृह दीड महिना बंद

चर्चगेट स्थानकात मोटरमनची मुख्य लॉबी आहे. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर मोटरमन हजेरी लावतात. त्यांच्या सोयीसाठी प्रसाधनगृहाशेजारी सुरु केलेले विश्रांतीगृह 5 जून रोजी केक शॉपला लागलेल्या आगीच्या घटनेपासून बंद आहे. दीड महिन्यात मोटरमन संघटनांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केल्यानंतरही विश्रांतीगृह कम कॅण्टीन सुरू करण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. या बंद विश्रांतीगृहात सध्या अस्वच्छ प्रसाधनगृहाची दुर्गंधी पसरली आहे.