संशयकल्लोळ! ते चार मंत्री कोण? सरकार अडकले हनी ट्रॅपमध्ये!!

महाराष्ट्राच्या राजकारणात हनी ट्रॅपमुळे खळबळ उडालेली आहे. या ट्रॅपमध्ये राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांचा समावेश असल्याचे बोलले जात असून हे मंत्री कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिक, ठाणे, मुंबई आणि मंत्रालयापर्यंत पसरले असून भाजप आणि मिंधे गटाच्या काही मंत्र्यांबाबत यामुळे संशयकल्लोळ उडाला आहे. हनी ट्रॅपचे उत्तर महाराष्ट्र कनेक्शन आणि या प्रकरणाच्या वाढत्या व्याप्तीमुळे महायुती सरकारच आता अडचणीत सापडण्याची दाट शक्यता आहे.

लोढाला अटक

भाजप कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात मुंबई पोलीसांनी पोस्कोअंतर्गत गुन्हे दाखला करून अंधेरीतून त्याला अटक केली. पोलिसांकडून जळगावचे जामनेर आणि पहूर या ठिकाणी त्याच्या मालमत्तेची झडती घेतली. त्याचे लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस पोलिसांनी जप्त केले.

चर्चा उत्तर महाराष्ट्राची

उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये घडलेल्या हनी ट्रॅप प्रकरणात आजी माजी मंत्री तसेच 72 वरिष्ठ सरकारी अधिकाऱयांचा समावेश आहे. जळगावचे जामनेर या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू असल्याचे बोलले जाते.

भाजप कनेक्शन

जळगाव जिह्यातील भाजपच्या मातब्बर नेत्याचा निकटवर्तीय म्हणून प्रफुल्ल लोढा ओळखला जातो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित कडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अवघ्या पाच दिवसांत त्यांनी माघार घेतली आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

ट्रॅपचा ट्रॅक…

  • हनी ट्रॅपच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पथक नाशिकमध्ये तळ ठोकून आहे.
  • पोलिसांनी दिवसभरात चार ते पाच ठिकाणी छापे टाकले.
  • हॉटेलमधील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले.
  • महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी हनी ट्रॅपची सुरुवात झाली. शिवसेनेचे 16-17 आमदार, 4 खासदार याच प्रकरणातून गळाला लावले. या सगळ्याची सूत्रं जामनेर, जळगाव नाशिक, मुंबई आणि दिल्लीमधून हलली आहेत. ज्यांनी हे केलं ते स्वतः हनी ट्रपमध्ये सापडले आहेत, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.