
‘मराठी बाणा’कार अशोक हांडे यांना यंदाचा ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना बुधवार, 13 ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. माटुंगा पश्चिमेकडील यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे सायंकाळी 5.30 वाजता पुरस्कार वितरण होणार आहे. ‘आत्रेय’ या संस्थेतर्फे दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे पुरस्कार दिला जातो.
आतापर्यंत कवी मंगेश पाडगावकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पं. हृदयनाथ मंगेशकर, रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, डॉ. जयंत नारळीकर अशा अनेक मान्यवरांना हा पुरस्कार दिला गेला आहे. आचार्य अत्रे यांच्या ‘झेंडूची फुले’ या विडंबनकाव्य संग्रहाला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त बुधवारी ‘झेंडूची फुले 100’ हा काव्य व विडंबनकाव्याचा संगीतमय कार्यक्रम राजेंद्र पै सादर करणार आहेत.