निवडणूक आयोगाला नेमकी कसली भीती वाटत आहे? मल्लिकार्जून खरगे यांचा संतप्त सवाल

बिहारमधील मतदार यादीच्या पुननिरीक्षण (SIR) आणि कथित ‘मत चोरी’ विरोधात सोमवारी विरोधी पक्षांच्या इंडिया अलायन्सच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, सपा प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी निवडणूक आयोगाला संतप्त सवाल विचारला आहे. यावर बोलताना मल्लिकार्जून खरगे म्हणाले, जर सरकार आम्हाला निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू देत नसेल, तर त्यांना कशाची भीती आहे हे आम्हाला समजत नाही?

दिल्ली पोलिसांकडून मोर्च्याच्या वेळी सहभागी असणाऱ्या खासदारांना बसमधून नेण्यात आले होते. मोर्चा पोलिसांकडून रोखण्यात आला त्यावेळी अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवरून उडी मारून आत गेले. राहुल गांधी यांनी पोलिसांच्या बसमधूनच गर्जना करत म्हणाले की, आमचा लढा सुरूच राहील. ते म्हणाले की, आमचा लढा राजकीय नाही तर संविधान वाचवण्यासाठी आहे.

अधिक बोलताना खरगे म्हणाले, या मोर्चात सर्व खासदार उपस्थित होते, आम्ही शांततेत मोर्चा काढत होतो. निवडणूक आयोगाने सर्व खासदारांना बोलवावे, बैठक घेऊन आमचे विचार मांडावेत अशी आमची इच्छा होती, परंतु निवडणूक आयोग म्हणत आहे की, फक्त 30 सदस्यांनी यावे. हे कसे शक्य आहे?