
लोकेश कनागराज दिग्दर्शित रजनीकांतचा आगामी मेगा रिलीज चित्रपट ‘कुली’ हा या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे आगाऊ बुकिंग सुरू झाले आहे आणि तो दक्षिण आणि उत्तरेकडे मात्र चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा अॅक्शन एंटरटेनर आता हिंदीतही विक्रमी कमाई करत आहे.
रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाची क्रेझ त्याच्या रिलीजपूर्वीच शिगेला पोहोचली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा चित्रपट हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘वॉर २’ चित्रपटाला टक्कर देणार आहे. असे असूनही, ‘कुली’ चित्रपटाची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे.
पहिल्या दिवशी रजनीकांतला बघण्यासाठी, मोठ्या संख्येने प्रेक्षक तिकिटे बुक करत आहेत. सॅकोनिल्कच्या आकडेवारीनुसार, हिंदी भाषेत आतापर्यंत चित्रपटाची 15 हजार 844 तिकिटे प्री-बुकिंग झाली आहेत. तेलुगूमध्ये आतापर्यंत कुलीची 9 हजार 67 तिकिटे प्री-बुकिंग झाली आहेत. ही सर्व आकडेवारी पाहता, संपूर्ण देशात आतापर्यंत कुलीची 8 लाख 36 हजार 886 तिकिटे प्री-बुकिंग झाली आहेत. या चित्रपटाची प्री बुकिंगमधून झालेली कमाई तब्बल 17.७३ कोटी रुपये आहे.
14 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘कुली’ची आगाऊ बुकिंग भरघोस आहे. तज्ञांचा अंदाज आहे की, पहिल्या दिवशी जगभरात हा चित्रपट 140 कोटींची कमाई करेल. रजनीकांत हे ‘वेट्टाय्यान’ चित्रपटात शेवटचे दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नाही. आता सुपरस्टार ‘कुली’ चित्रपटातून भव्य पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रजनीकांत यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये दोन वर्षांचा ब्रेक कायम ठेवला आहे.
रजनीकांत व्यतिरिक्त, नागार्जुन, सौबिन शाहीर, आमिर खान, उपेंद्र आणि श्रुती हासन यासारख्या कलाकारांनी ‘कुली’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.