जम्मू कश्मीरमधील किश्तवाडमध्ये ढगफुटी, पूरात 10 जणांचा मृत्यू

जम्मूच्या किश्तवाडमधील चशोटी परिसरात गुरुवारी ढगफुटीची घटना घडली आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ढगफुटी झाल्यानंतर परिसरात पूर आलेला आहे. किश्तवाडचे उपायुक्त पंकज शर्मा म्हणाले, “किश्तवाडच्या चाशोटी भागात अचानक पूर आला आहे.

जम्मू आणि कश्मीरच्या उपराज्यपालांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, “किश्तवाडमधील ढगफुटीच्या घटनेने मी दुःखी आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. बचाव आणि मदत कार्य अधिक वेगवान करण्याचे आणि बाधितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश नागरी, पोलिस, सैन्य, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अधिकाऱ्यांना दिले आहेत.”

श्रीनगर हवामान केंद्राने म्हटले आहे की, पुढील ४-६ तासांत जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता आहे. कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, श्रीनगर, गंदरबल, बडगाम, पूंछ, राजौरी, रियासी, उधमपूर, डोडा, किश्तवारच्या डोंगराळ भागात, काझीगुंड-बनिहाल-रामबन अक्षात काही काळासाठी मुसळधार पाऊस पडू शकतो.

याशिवाय, काही संवेदनशील ठिकाणी आणि डोंगराळ भागात ढगफुटी, अचानक पूर, भूस्खलनाची शक्यता आहे. हवामान खात्याने वुलर तलाव, दाल तलाव आणि इतर जलाशयांमध्ये बोटिंग/शिकारा यावरही निर्बंध आणले आहेत.