
मुंबईत रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी मुसळधार बरसायला सुरुवात केल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली. पश्चिम रेल्वेही उशिराने सुरू होती. यातच रस्ते वाहतूकही रखडल्याने मुंबईकरांचे हाल झाले. अर्धा ते एक फुटापर्यंत पाण्यात रूळ गायब झाले होते. त्यातून अंदाज काढून लोकल ट्रेन चालवणे मुश्किल बनल्याने लोकल सेवेच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला. हार्बर रेल्वेवर वडाळा, कुर्ला, सानपाडा, गोवंडी, वाशी स्थानक परिसरात पाणी साचल्याने लोकल वाहतूक ढेपाळली. पश्चिम रेल्वेवर काही भागांत रुळांशेजारील कचरा वाहून रुळांवर आला आणि पाणी साचले. तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकल ट्रेन सकाळपासून सायंकाळपर्यंत तब्बल पाऊण ते तासभर उशिराने धावल्या. त्यात प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
बोरिवलीतून वांद्रेला जाण्यासाठी तब्बल 5 तास
पश्चिम उपनगरातून अहमदाबादला जाणाऱया पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच पूर्व उपनगरातील पूर्व द्रुतगती महामार्गावर
सोमवारी सकाळी अभूतपूर्व वाहतूककोंंडी झाली होती. रात्रीपासून धुमशान घातलेल्या पावसाने विलेपार्ले परिसरात महामार्गावर पाणी साचले. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रस्ते वाहतूक अत्यंत कूर्मगतीने सुरू राहिली. बोरिवलीहून वांद्रे-कलानगरला पोहोचण्यासाठी वाहनधारकांना तब्बल चार ते पाच तास लागले. महामार्गावर बोरिवलीपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. यात रुग्णवाहिकांचीही कोंडी झाली. अधूनमधून सर्व्हिस रोडच्या माध्यमातून रुग्णवाहिकांना वाट करून देण्यात आली.
दिवसभर पावसाने अजिबात उसंत न घेतल्याने शेकडो वाहनधारकांचा अख्खा दिवस रस्ते प्रवासातच वाया गेला. विलेपार्ले परिसरात विमानतळावर जाणाऱया खासगी गाडय़ांची भर पडल्याने तेथे अधिक हाल झाले. अनेक विमान प्रवासीही वाहतूककोंडीत अडकल्याने त्यांची नियोजित विमाने चुकली. पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर, विक्रोळी परिसरात वाहतूककाsंडी झाली होती. पश्चिम उपनगरातून जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि आरे रोडवरून जाणारी वाहने विक्रोळीत पूर्व द्रुतगती महामार्गावर आल्याने तेथे वाहनांना तासभर रखडावे लागले. परिणामी, दक्षिण मुंबईकडे जाणाऱया वाहनांची रखडपट्टी झाली.
बेस्टचे मार्ग बदलल्याने हाल
‘मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी’ असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाडय़ा ठिकठिकाणी वाहतूककोंडीमध्ये अडकल्या. त्यात अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. दिवसभरात एकटय़ा मुंबई शहर परिसरात 50 हून अधिक बसफेऱ्यांचे मार्ग बदलले. अंधेरी, कुर्ला, वांद्रे, माहीम, धारावी, सायन, वडाळा, दादर परिसरात अनेक बसफेऱया वाहतूककोंडीमध्ये तासन्तास अडकल्या होत्या. अनेक भागांत तीन ते चार फूट पाणी साचल्याने त्यातून मार्ग काढताना बेस्ट बसगाडय़ांना धक्का मारण्याचीही वेळ आली. याचा त्रास शहर आणि उपनगरांतील लाखो मुंबईकरांना झाला.
मुंबई शहर आणि उपनगरांत रविवारी मध्यरात्रीपासून धो-धो पाऊस कोसळला. दादर ते माटुंगा, कुर्ला, विद्याविहार स्थानक परिसरात सकाळपासून रेल्वे रुळांवर पाणी साचले. त्यामुळे लोकल वाहतुकीचा वेग मंदावला. सुरुवातीला 15 मिनिटे उशिराने धावणाऱया लोकल ट्रेनचा नंतर जागोजागी पाऊण ते तासभर खोळंबा झाला. या गोंधळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, कल्याण आदी स्थानकांत प्रवाशांची प्लॅटफॉर्मवर तसेच रेल्वे पुलांवर मोठी गर्दी उसळली होती. यादरम्यान गाडय़ांच्या मार्गातदेखील बदल केले जात होते. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. धावाधाव करताना अनेक प्रवासी पाय घसरून खाली पडल्याच्याही अनेक घटना घडल्या.
रेल्वे प्रवाशांची रखडपट्टी, तासन्तास रेल्वेतच
मध्य रेल्वेची लोकल सेवा सकाळपासूनच रडतखडत सुरू होती. त्यामुळे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेले नोकरदार मंडळी सोशल मीडिया वा अन्य माध्यमांतून रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत सूचनांची माहिती मिळवत होते. प्रशासनाने लोकल सेवा 12 ते 15 मिनिटे उशिराने सुरू असल्याचा दावा केला. प्रत्यक्षात लोकल प्रवास करणाऱया प्रवाशांची 30 ते 45 मिनिटे रखडपट्टी झाली. त्यात कित्येक गाडय़ा रद्द करण्यात आल्या. तसेच आसनगाव, टिटवाळा अशा लांबच्या गाडय़ा अचानक कल्याणपर्यंत चालवण्यात आल्या. याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. शीव ते कल्याण जाण्यासाठी दरदिवशीपेक्षा 40 मिनिटे अधिक वेळ लागला.
आसनगाव लोकल अचानक रद्द केल्यामुळे कल्याण लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली, असे प्रवासी अमित भालेराव यांनी सांगितले. हीच परिस्थिती पश्चिम रेल्वेवरही पाहायला मिळाली. चर्चगेट ते विरारपर्यंतची लोकल वाहतूक पूर्णपणे ढेपाळली. काही ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने अनेक लोकल फेऱया रद्द करण्यात आल्या. तसेच इतर लोकल तब्बल दीड ते दोन तास उशिराने गंतव्य स्थानकात पोहोचत होत्या. चर्चगेट ते विरारपर्यंतच्या प्रवासासाठी साडेतीन ते चार तास लागल्याची प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी दिली. विरार ते गोरेगाव प्रवासासाठी एरव्ही एक तास लागतो. सोमवारी दुपारी याच प्रवासासाठी दोन तास ट्रेनमध्येच रखडल्याचे विरार पश्चिमेकडील शैलेश कदम यांनी सांगितले.
अनेक विमानांचे लँडिंग, उड्डाणे रद्द
कमी दृश्यमानता आणि खराब हवामानामुळे 10 विमानांचे लॅण्डिंग रद्द करण्यात आले. त्या विमानांनी बराच वेळ हवेतच घिरटय़ा घातल्या. नंतर ती विमाने दुसरीकडे वळवली. तसेच कित्येक विमाने अर्धा ते एक तास धावपट्टीवर उभी करून ठेवण्यात आली. तासभर विलंबाने विमाने उड्डाण घेत होती. दिवसभरात शेकडो प्रवासी विमानतळावर खोळंबले. विमान वाहतुकीच्या विस्कळीत वेळापत्रकाचा मनस्ताप वृद्ध, लहान मुले आणि महिलांना सहन करावा लागला.
दुपारीच मेट्रोच्या स्थानकांत उसळली गर्दी
पावसाचा जोर वाढतच चालल्याने दुपारी खासगी आणि सरकारी कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आले. हवामान खात्याने रविवारी मुंबईला रेड अलर्ट दिला होता. मात्र सरकारने तो इशारा गांभीर्याने घेतला नव्हता. सोमवारी पावसाने संपूर्ण शहर आणि उपनगरांत पूरसदृश परिस्थिती निर्माण केल्यानंतर शाळा, महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे दुपारच्या वेळेत रेल्वे आणि मेट्रोच्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली.
अंधेरी परिसरात अनेक कॉर्पोरेट कार्यालये असून एरव्ही ‘पीक अवर्स’ला मेट्रो स्थानकांत प्रचंड गर्दी होते. सोमवारी दुपारी तशीच परिस्थिती पाहायला मिळाली. अंधेरी, चकाला, घाटकोपर या प्रमुख स्थानकांच्या प्रवेशद्वारावर प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. सर्वच कार्यालयांचे कर्मचारी एकाचवेळी बाहेर पडले आणि वाहतूककाsंडीचा त्रास नको म्हणून मेट्रो प्रवासाकडे वळले होते. भरदुपारी पहिल्यांदाच ‘पीक अवर्स’पेक्षा भयंकर गर्दीचा सामना मेट्रो स्थानकात करावा लागला, अशी प्रतिक्रिया नियमित प्रवाशी राजेश पावले यांनी दिली.
शाळा सुटली…
मुंबईत रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने सकाळीदेखील उसंत घेतली नसताना शाळा नियमितपणे सुरू होत्या. मात्र पावसाचा जोर वाढल्याने संपूर्ण वाहतूक सेवाच कोलमडली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी शाळा-कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली. यावेळी शाळेतून घरी येताना लहान मुलांनीही पाण्यातून वाट काढत आणि एकमेकांना साथ देत गुडघाभर पाण्यातून घर गाठावे लागले.