BCCI साठी महिलांच्या सिंदूर पेक्षा पैसा महत्त्वाचा आहे, आदित्य ठाकरे यांचे टीकास्त्र

आगामी आशिया कप मालिकेत टीम इंडिया पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळणार आहे. एकि कडे पाकिस्तानच्या हॉकी टीमने सुरक्षेच्या कारणास्तव हिंदुस्थानात येण्यास नकार दिला आहे. एकीकडे पाकिस्तान नकार देत असताना बीसीसीआय मात्र टीम इंडिया व पाकिस्तानमधील क्रिकेटच्या सामन्यावर अडून आहे. त्याबाबत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीया यांना पत्र लिहले आहे.

गेल्या दशकभरात, पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून अनेकदा आपल्या देशावर आणि नागरिकांवर दहशतवादी हल्ले झाले आहेत. केंद्र सरकारकडून अनेकदा याबाबत पाकिस्तानला याबाबत सुनावले आहे. नुकतेच स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही, असा इशारा पाकिस्तानला दिला. तरीही, दुर्दैवाने आणि निर्लज्जपणे, बीसीसीआय आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी आपल्या संघाला पाठवत आहे. बीसीसीआय राष्ट्रीय हितापेक्षा वर आहे का? ते आपल्या जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? आपल्या देशातील महिलांच्या सिंदूरपेक्षा बीसीसीआय मोठी आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी या पत्रातून केला आहे.

अशा दहशतवादी कारवायांमुळे अनेक देशांना खेळांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. दहशतवाद हे असे एक कारण आहे जे आपल्या दोन्ही देशांना शांततेत प्रगती करू देत नाही. तरीही, केवळ बीसीसीआयच्या आग्रहामुळे आणि कदाचित पैशाच्या आणि जाहिरातींच्या कमाईच्या हव्यासामुळे, ते आपल्या संघाला पाकिस्तानसोबत खेळायला पाठवत असतील. BCCI साठी महिलांच्या सिंदूर पेक्षा पैसा महत्त्वाचा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आपण या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सांगण्यासाठी जगभर शिष्टमंडळे पाठवली, आता आपण त्यांच्यासोबत क्रिकेट का खेळत आहोत याचे समर्थन करण्यासाठी पण शिष्टमंडळ पाठवणार का? असाही सवाल त्यांनी सरकारला केला.

सुरक्षेच्या कारणास्तव, पाकिस्तानने भारतात हॉकी खेळण्यास नकार दिला आहे, पण बीसीसीआय स्वार्थासाठी पाकिस्तानशी खेळत आहे हे खरोखरच लज्जास्पद कृत्य आहे. मला आशा आहे की, जरी आपण राजकारणाच्या वेगवेगळ्या बाजूंनी असलो तरी, आपण या विचारावर एकाच पानावर असू, जसे आपण ऑपरेशन सिंदूर दरम्यान माननीय पंतप्रधानांना पाठिंबा दिला होता,असे सांगत आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयवर जोरदार टीका केली,