
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन असलेली वाहने गणपतीच्या कालावधीत 23 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजेपासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या महामार्गावरून वाहतूक करू शकणार नाहीत. अवजड वाहनांमध्ये ट्रक, मल्टिएक्सल, ट्रेलर, लॉरी आदी वाहनांचा समावेश आहे.
याशिवाय पाच व सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन, गौरी-गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणपती विसर्जन, परतीचा प्रवासाकरिता 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या महामार्गावर जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
हे निर्बंध जेएनपीटी बंदर ते जयगड बंदर येथून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, औषधे, लिक्विड मेडीकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱया वाहनांना लागू राहणार नाही. तसेच रस्ता रुंदीकरण, रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने-आण करणाऱया वाहनांनाही ही बंदी लागू राहणार नाही.