लक्षवेधी – जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी

1.8 कोटी पॅकेजवाला विद्यार्थी निघाला फेक

ग्रेटर नोएडा परिसरातील एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडियोत आयआयएमटी कॉलेजने  आमच्या विद्यार्थ्याला 1.8 कोटींचे पॅकेज असलेली नोकरी लागल्याचा दावा कॉलेजकडून करण्यात आला. पण प्रत्यक्षात हा दावा खोटा निघाला आहे. हा तरुण आईस्क्रीम विकतो. व्हिडीओत शैलेंद्र नावाचा एक आईस्क्रीम विक्रेता तरुण दिसतो. तो इटावाचा रहिवासी आहे. त्याचे आयआयएमटी कॉलेजशी काहीही देणेघेणे नाही. तो फक्त बारावीपर्यंत शिकला आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ मित्रांनी मौजमजेत चित्रित केल्याचे शैलेंद्रने सांगितलं. घाबरलेल्या शैलेद्रंने  पोलीस आणि कॉलेज प्रशासनाची माफी मागितली.

हेराफेरी 3’ नंतर प्रियदर्शन इंडस्ट्री सोडणार

कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा सिनेमात हातखंडा असणारे आणि अनेक हिट सिनेमे देणारे प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हेराफेरी 3 सह काही सिनेमांचे चित्रीकरण पूर्ण करून इंडस्ट्री सोडण्याची तयारी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका मनोरंजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. निर्मात्यांनी अनेकदा विनंती केल्यामुळे हेराफेरी 3 चे दिग्दर्शन करण्यासाठी तयार झालो. साधारणतः मी माझ्या सिनेमांचे सीक्वेल बनवत नाही. ही माझी काम करण्याची पद्धत नाही. मी आता थकलो असून काही सिनेमे केल्यानंतर मी निवृत्ती घेणार असल्याचे प्रियदर्शन यांनी म्हटले आहे.

पत्नीने पोलिसांना रोखलं, पतीने जाळल्या नोटा

बिहारमध्ये एका सरकारी अभियंत्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात प्रशासनाला मोठे घबाड सापडले. या अधिकाऱ्याला अटक करण्यापूर्वी एक नाटय़मय प्रकार घडला. एकटी असल्याचे सांगू पत्नीने पोलिसांना रोखले, तर पतीने आत 500 रुपयांच्या नोटा जाळल्या.  मधुबनी येथील ग्रामीण बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद कुमार राय यांच्याकडे पाच कोटींची रोकड आहे, अशी माहिती गुरुवारी रात्री बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.पाटण्यातील भूतनाथ रोडवरील या अधिकाऱ्याच्या चारमजली निवासस्थानी शोध घेण्यासाठी पोहोचले. तेव्हा राय यांनी नोटा जाळण्याचा प्रताप केला.

श्रद्धा कपूरचे व्हेरिफाईड अकाऊंट झाले ब्लॉक

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने अलीकडेच लिंक्डइनवर तिचे अकाउंट तयार केले होते; परंतु ते बनावट असल्याचे समजून ते ब्लॉक करण्यात आले आहे. आता अभिनेत्रीने स्पष्ट केले आहे की, ते अकाउंट तिचे होते, परंतु बनावट घोषित झाल्यानंतर लोक तिचे प्रोफाईल पाहू शकत नाहीत. श्रद्धा कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट करत म्हटलंय, ‘‘प्रिय लिंक्डइन, मी माझे स्वतःचे अकाउंट वापरू शकत नाही. कारण लिंक्डइनला वाटते की ते बनावट आहे. कोणी मला मदत करू शकेल का? मला माझा उद्योजकीय प्रवास शेअर करायचा आहे; परंतु अकाउंट सुरू करणे हा स्वतःच एक प्रवास बनला आहे.’’