महाराष्ट्रातील 17 एक्प्रेस, पॅसेंजर तीन वर्षांनंतरही बंद; कोविडनंतरही सर्वसामान्यांचा हक्क अडकलेलाच!

>>मंगेश मोरे

कोविड महामारीच्या लॉकडाऊन काळात बंद केलेल्या महाराष्ट्रातील 17 एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन तीन वर्षांनंतरही सुरू केलेल्या नाहीत. त्यात सह्याद्री एक्स्प्रेस, हुतात्मा एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी पॅसेंजर, दादर-रत्नागिरी पॅसेंजरचा समावेश आहे. कामगार, पंढरपूर-शिर्डीला जाणारे भाविक, छोटे व्यापारी, विद्यार्थ्यांसाठी सोयीच्या असलेल्या गाडय़ा बंद ठेवून प्रशासनाने सामान्यांच्या हक्कावर गदा आणल्याची नाराजी प्रवासी व्यक्त करीत आहेत.

कोविड महामारीत लॉकडाऊनचे निर्बंध, प्रवाशांची घट अशा कारणांमुळे तात्पुरत्या कालावधीसाठी गाडय़ा बंद केल्या होत्या. कोविडचा संसर्ग थांबल्यानंतर त्या गाडय़ा पूर्ववत सुरू करणे अपेक्षित होते. मात्र तीन वर्षांनंतरही सामान्यांना त्या गाडय़ांअभावी हाल सोसावे लागत आहेत. राज्यातील विविध मार्गांवरील 17 एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन कायमच्या बंद केल्या आहेत. संबंधित मार्गांवरील मोठ्या प्रवासी संख्येमुळे रेल्वेला चांगला महसूल मिळत होता. संबंधित गाडय़ा पुन्हा सुरू करण्यास वेळ व मार्ग उपलब्धतेचा प्रश्न आड येत असल्याचे कारण प्रशासन देत आहे. मात्र महागडे तिकीट असलेल्या गाडय़ा सुरू करण्यास प्रशासन लगेच तयार होते. हा सामान्यांच्या स्वस्त प्रवासावर गंडांतर आणण्याचा प्रयत्न आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी संघटना देत आहेत.

काही वर्षांपूर्वी रेल्वेने ‘झीरो बेस्ट टाईमटेबल’ असे गोंडस नाव देऊन रेल्वे गाडय़ा तसेच थांबे कमी केले. प्रशासनाने प्रवाशांना नवीन सुविधा पुरवण्याची गरज होती. मात्र सध्या जुन्या सोयीच्या गाडय़ा मागण्याची वेळ आली. प्रशासन नको ती कारणे देऊन त्या गाडय़ा सुरू करण्यास असमर्थता दर्शवत आहे. रेल्वेने महाराष्ट्रातील गाडय़ा आकसाने बंद केल्या आहेत. – अक्षय महापदी, रेल्वे अभ्यासक

बंद ठेवलेल्या काही गाडय़ा

n सह्याद्री एक्स्प्रेस (मुंबई ते कोल्हापूर)

n पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस

n मुंबई-भुसावळ पॅसेंजर

n मुंबई-पंढरपूर / साईनगर शिर्डी-मुंबई फास्ट पॅसेंजर

n पुणे-कर्जत/पनवेल शटल

n कुर्ला-मनमाड-कुर्ला गोदावरी एक्प्रेस

n दादर-रत्नागिरी पॅसेंजर (दादर येथून सेवा बंद)