कोकणचा निम्मा प्रवास खड्डयातच! माणगाव ते लोणेरेदरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर ‘चंद्र’दर्शन

गणेशोत्सवासाठी चाकरमानी विविध वाहनांनी आपल्या गावाकडे निघाले खरे, पण गणपतीआधीच त्यांना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांचे दर्शन घ्यावे लागले. सरकारने आश्वासन देऊनही खड्डे भरलेच नाहीत. त्यामुळे माणगावजवळ सलग दुसऱया दिवशी टॅफिक जाम झाले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. माणगाव ते लोणेरे या मार्गावर 468 खड्डे तसेच होते. या खड्डेकोंडीच्या निमित्ताने सरकारची बनवाबनवी उघडकीस आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने त्याचा त्रास गणेशभक्तांना होत आहे. मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे त्वरित भरण्यात येतील, असे आश्वासन सरकारने दिले होते. पण प्रत्यक्षात हे खड्डे भरलेच नाहीत. त्याचा फटका कोकणात गणपतीसाठी जाणाऱया चाकरमान्यांना बसला आहे. वाहने संथगतीने धावत असून पोलादपूर-कशेडी घाट हे 155 किमीचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना साडेपाच ते सहा तासांचा कालावधी लागला. त्यामुळे चाकरमान्यांनी संताप व्यक्त केला.

ही नागरिकांना  दिलेली शिक्षाच! आदित्य ठाकरे यांचा निशाणा

राज्यभरातील कोकणवासीय गणेशोत्सवासाठी गावी निघालेत. पण रस्त्यांची दयनीय अवस्था, रेल्वेतील अनियंत्रित गर्दी, तिकिटासाठी 12-12 तास ताटकळत रांगेत उभे राहणे ही नागरिकांना दिलेली शिक्षाच, अशा शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. ‘गणराया, कोकणवासीय तुझ्या भेटीसाठी आतुरतेने गावी निघालेत. त्यांचा प्रवास सुखाचा, सुरक्षित होऊ दे आणि दरवर्षी कोकणवासीयांच्या संयमाची परीक्षा घेणारे हे विघ्न दूर होऊ दे,’ अशी प्रार्थना त्यांनी गणरायाला केली.