
धारावीतील कोळीवाडा आणि कुंभारवाडय़ाच्या विकासाचा प्लॅन नेमका काय आहे तो तेथील रहिवाशांना दाखवा अन्यथा अदानी समूहाला धारावीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिला. महायुती सरकारला अदानींची सेवा करायची होती, म्हणून तीन वर्षे महानगरपालिका निवडणूक घेतली नाही, असा आरोपही त्यांनी केला. मुंबई लुटेल, त्याला मी नडणार म्हणजे नडणारच, असेही ते म्हणाले.
धारावीचा विकास धारावीकरांच्या सहभागानेच व्हायला हवा यासाठी शिवसेनेने लढा उभारला आहे. त्याअंतर्गत आज त्यांनी धारावी कोळीवाडय़ात जाऊन कोळी बांधवांशी संवाद साधला. धारावी पुनर्विकास प्रकल्पातून (डीआरपी) कोळीवाडय़ाला वगळले आहे, आपल्या व्यवसायाला आता काहीच धोका नाही, असे वाटत असेल तर सावधपणे पावले टाका, असा सल्ला यावेळी आदित्य ठाकरे यांनी कोळी बांधवांना दिला. काही दिवसांपूर्वी आपण कुंभारवाडय़ाला भेट दिली होती. तेव्हा तेथील रहिवाशांनी पुनर्विकासाबद्दल भीती व्यक्त केली होती. टॉवरमध्ये पाठवले गेले तर पिढय़ान्पिढय़ा सुरू असलेल्या कुंभार व्यवसायाचे काय होणार? असा प्रश्न त्यांनी केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, माजी महापौर श्रद्धा जाधव, धारावी कोळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष डॉमनिक कोळी, दिगंबर कोळी, उपविभागप्रमुख जोसेफ कोळी आदी उपस्थित होते.
धारावीत 70 टक्के जमीन महानगरपालिकेची आहे. पालिकेत कोणताही कायदा मंजूर करताना त्याला नगरसेवकांची मान्यता लागते. समित्यांची आणि महापौरांची मान्यता लागते. महायुती सरकारला मुंबईची नव्हे तर अदानींची सेवा करायची होती म्हणून गेली तीन वर्षे महापालिकेच्या निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत.
आताच जागे व्हा
धारावीत टॉवर आल्यानंतर कोळी बांधवांना बाहेर काढले तर, जे करायचे आहे ते आताच करून घ्यावे लागेल. आता जर ही वेळ निघून गेली तर, कधी पुन्हा ही वेळ हाती लागणार नाही, असे आदित्य ठाकरे कोळी बांधवांना उद्देशून म्हणाले. पुनर्विकास 100 टक्के झाला पाहिजे, पण तो रहिवाशांचा होतोय की अदानी समूहाचा हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.
टॉवरमध्ये गेलात तर मासे सुकवणार कुठे?
मुंबईत अनेक एकरांवर पसरलेले कोळीवाडे आहेत. बैठी घरे, बंगले, वास्तू आणि मंदिरे आहेत. क्लस्टरच्या नावाखाली कोळी बांधव 350 चौरस फुटांच्या घरामध्ये जाऊ शकतात का? मासे घेऊन आल्यानंतर ड्राय डॉकिंग आपल्या बोटीचे होते. पण मासे आपण सुकायला टाकतो, ते टाकणार कुठे, ठेवणार कुठे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अदानीचे कटकारस्थान हाणून पाडू
आदित्य ठाकरे यांनी यावेळी भाजपचाही समाचार घेतला. धारावीसाठी शिवसेना आवाज उठवू लागल्याने भाजपाकडून अपप्रचार केला जात असल्याकडे त्यांनी यावेळी सर्वांचे लक्ष वेधले. शिवसेनेचे आंदोलन बांगलादेशी आणि रोहिंग्यांसाठी चालले आहे, असा प्रचार भाजपकडून सुरू आहे. असा प्रचार करून मुंबईत धारावीकरांविरुद्ध वातावरण निर्माण करायचे आणि धारावीतून त्यांना बाहेर काढायचे, असे कटकारस्थान आहे. ते हाणून पाडावेच लागेल, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.