
कर्जबाजारीपणाला कंटाळून आईची हत्या करून मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना रत्नागिरीत घडली. सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पूजा शशिकांत तेली (45) आणि अनिकेत तेली (25) अशी मायलेकाची नावे आहेत.
नाचणे गावातील शांतीनगर येथे अनिकेत आई-वडिलांसह राहत होता. अनिकेतच्या वडिलांनी कर्ज काढले होते. हा कर्जाचा बोजा वाढत गेल्याने अनिकेतच्या वडिलांनी दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. वडिलांच्या निधनानंतर सर्व कर्जदार पैशांसाठी वारंवार अनिकेतकडे तगादा लावत होते.
अखेर याला कंटाळून अनिकेतने मंगळवारी पहाटेच्या सुमारास आईच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर अनिकेतने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रत्नागिरी पोलीस पुढील तपास करत आहेत.