
पत्नीने अंडाकरी बनवण्यास नकार दिला म्हणून नाराज पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. टिकुराम सेन असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. गावाजवळ एका झाडाला तिकुरामचा मृतदेह लटकताना पाहून गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस पुढीत तपास करत आहेत.
छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील संकरा गावात ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, टिकुराम सोमवारी सायंकाळी बाजारातून अंडी घेऊन घरी आला. त्याने पत्नीला अंडाकरी बनवण्यास सांगितले. मात्र मंगळवारी तीजचा उपवास असल्याने तिने अंडाकरी बनवण्यास नकार दिला. त्यांच्या परंपरेनुसार तीजला ‘करू भात’ खाल्ला जातो.
पत्नीने नकार दिल्याने टिकुराम रागावून घराबाहेर पडला. काही वेळाने त्याचा मृतदेह गावाजवळील झाडाला लटकलेला आढळला. कुटुंबातील सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवत पुढील तपास सुरू केला आहे. टिकुरामने अंडाकरी वादातून आत्महत्या केली की अन्य काही वादातून याबाबत पोलीस तपास करत आहेत.