
हिंदुस्थानच्या नौदलाच्या संत्री चौकीतून एक रायफल आणि दारूगोळा गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संत्री चौकीत एक अग्निवीर आला. त्यानंतर तो रायफल आणि मॅगझीन घेऊन गायब झाला. हा प्रकार लक्षात येताच नौदलाने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली आहेत.
दक्षिण मुंबईत नौदलाच्या निवासी भागात संत्री चौकी आहे. गेल्या आठवड्यात नौदलाच्या संत्री चौकात कनिष्ठ खलाशी हा ड्युटीला होता. तेव्हा नौदलाच्या गणवेशातील एक जण तेथे आला. त्याने स्वतः अग्निवीर असल्याचे भासवत ड्युटी रिलीव्हसाठी आलो असे भासवले. संत्री चौकीची ड्युटी करणाऱ्या खलाशाने रायफल आणि मॅगझीन त्याला दिले. त्यानंतर खलाशी तेथून निघून गेला.
काही वेळाने संत्रींची ड्युटी घेणारा व्यक्ती हा रायफल आणि मॅगझीन घेऊन गायब झाल्याचे उघड झाले. हा प्रकार लक्षात आल्यावर नौदलाने शोध मोहीम हाती घेतली आहे. याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. मुंबई पोलिसांनीदेखील स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथके तयार केली आहेत. ही पथके ती रायफल आणि मॅगझीन घेऊन गेलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. अत्यंत संवेदनशील ठिकाणी तो व्यक्ती आला कसा हे स्पष्ट झाले नाही. या घटनेला कारणीभूत असलेल्या परिस्थितीची चौकशीसाठी मंडळ स्थापन करण्यात आले आहे.