ना प्रकल्प उभारला, ना मोबदला दिला! आमच्या जमिनी परत द्या; अलिबागच्या खारेपाटातील शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

पटनी एनर्जी व अन्य काही कंपन्यांनी प्रकल्प उभारण्यासाठी अलिबागच्या मेढेखार व परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी खरेदी केल्या होत्या, परंतु या ठिकाणी प्रकल्प सोडाच, पण शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण मोबदलादेखील दिलेला नाही. त्यामुळे बळकावलेल्या जमिनी परत करा अशी मागणी करत आज अलिबागच्या खारेपाट विभागातील शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.

अलिबागच्या खारेपाट विभागातील मेढेखार, कालवडखार, कुसुंबळे, कातळपाडा, काचळी, पिटकिरी, खातविरा आदी गावांतील ३८० खातेदार शेतकऱ्यांची ७५० एकर जमीन ५० टक्के मोबदला देऊन संबंधित कंपन्यांनी ताब्यात घेतल्या होत्या. २००९ मध्ये एकरी साडेतीन लाख रुपये असा दर निश्चित झाला होता. मात्र त्यावेळी शेतकऱ्यांना एकरी ५० टक्के म्हणजे पावणेदोन लाख रुपये देण्यात आले. उर्वरित रक्कम अद्याप अदा करण्यात आलेली नाही, असे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या १८ वर्षांत या जमिनींवर प्रकल्पाची एकही वीट उभी राहिली नाही. उलट खाडीची बांधबंदिस्ती न झाल्याने आजूबाजूच्या पिकत्या जमिनी नापीक होत आहेत. त्यामुळे या सर्व जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याबाबतचा निर्णय महसूल प्रशासनाने दिला होता, परंतु अद्याप त्यावर कार्यवाही न झाल्याने समाजक्रांती आघाडी संचालित अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून आज आंदोलन करण्यात आले.

“जमिनींचे व्यवहार होऊन १८ वर्षे झाली, परंतु त्यावर कुठलाच प्रकल्प उभारला नाही. त्यामुळे या जमिनी आम्हाला परत करणे कायद्याने बंधनकारक आहे. महसूल विभागाने निर्णय देऊनही कार्यवाही होत नाही. आम्हाला जमिनींचा मोबदलादेखील परिपूर्ण मिळालेला नाही यासाठी हे आंदोलन करण्यात आले.”

प्रकाश खरसांबळे, आंदोलक शेतकरी