
पलावा पूल सुरू होऊन अवघे दोन महिने झाले असताना पुलावर खड्डेच खड्डे पडले आहेत. खड्डे पाहता चंद्रसफरची आठवण येते. निकृष्ट कामामुळे पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून डोंबिवलीकर मेटाकुटीला आले आहेत. पुलाच्या बांधकामात आणि पुनर्पुष्ठीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाला असून दोषींवर कारवाई करावी. तसेच तातडीने खड्डे भरावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिला आहे.
कल्याण-शील मार्गावरील पलावा उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूककोंडी कमी होईल असे वाटत होते. मात्र दोनच महिन्यात पुलावर खड्डेच खड्डे पडले आहेत. दोन महिन्यात दोन ते तीन वेळा पुलावरील रस्त्याचे पुनर्गुष्ठीकरण करण्यात आले. तरीदेखील रस्त्याची स्थिती दयनीय आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन पलावा पूल वाहतुकीसाठी खड्डेमुक्त करावा अशी मागणी केली आहे. शिवाय निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही राहुल भगत सांनी दिला आहे