तीन वर्षांनंतर दिसला गं बाई दिसला…डहाणूच्या चंद्रसागर खाडीत चित्रबलाकचे आगमन

बेकायदा भरावामुळे डहाणूच्या चंद्रसागर खाडीकडे पाठ फिरवलेल्या चित्रबलाक या देखण्या करकोचा जातीच्या पक्ष्यांचे तीन वर्षांनंतर पुन्हा आमगन झाले आहे. या पक्ष्यांनी खाडीत येणे बंद केल्यामुळे पक्षीप्रेमींची मोठी निराशा झाली होती. मात्र हा पक्षी पुन्हा खाडीत आल्यामुळे दिसला गं बाई दिसला.. हे ‘पिंजरा’ चित्रपटातील गीत अनेक निसर्ग आणि पर्यावरणप्रेमींच्या ओठावर आले आहे.

चंद्रसागर खाडीत गेल्या काही वर्षांपूर्वी बेकायदा भराव टाकल्यामुळे पाणथळ पक्ष्यांनी या परिसराला पाठ फिरवली होती. कांदळवनाचा नाश होऊन जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला होता. यावर सजग नागरिक संगीता कडू यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश देत दोन महिन्यांपूर्वी महसूल विभागाच्या मदतीने खाडी भरावमुक्त करण्यात आली. भराव हटवल्यानंतर खाडीतील पाणीप्रवाह आणि नैसर्गिक वातावरणाला नवा जीव मिळाला. याच पोषक वातावरणामुळेच स्थलांतरित चित्रबलाक पक्ष्यांनी पुन्हा येथे येण्याचा मार्ग धरला आहे. अधिवासासाठी नैसर्गिक वातावरण तयार झाल्याने इतरही पक्षी या खाडीकडे आकर्षित होण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
डहाणू परिसरातील स्थानिक नागरिक, हौशी पर्यटक तसेच पक्षीप्रेमींनी या पक्ष्यांचे थेट दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला. वाईल्ड केअर स्वयंसेवक सागर पटेल आणि छायाचित्रकार समीर भालेरकर यांनी या दुर्मिळ क्षणांची छायाचित्रे टिपली आहेत. ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चंद्रसागर खाडीकडे निसर्गप्रेमींचा ओघ वाढला आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून डहाणू चंद्रसागर खाडी परिसरात हे पक्षी पाहायला मिळत आहेत, असे वाईल्ड केअरचे सदस्य हार्दिक सोनी यांनी सांगितले आहे.