मुंबई महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 492 हरकती, पहिल्या दिवशी 189 हरकती आणि सूचनांवर सुनावणी

मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण 492 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या. त्यावर आजपासून सुनावणी सुरू झाली. 189 हरकती आणि सूचनांवर आज राज्याचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण केंद्र येथे सुनावणी पार पडली.

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. याअंतर्गत 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यावर 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. या प्रारूप रचनेसंदर्भात एकूण 492 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या. यातील 189 सूचना आणि हरकतींवर आज सुनावणी पार पडली. राज्य शासनाने नियुक्त केलेले प्राधिकृत अधिकारी तसेच राज्याचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि विशेष कार्य अधिकारी विजय बालमवार यांच्यासह संबंधित अधिकारी सुनावणीसाठी उपस्थित होते.

आज आणि उद्याही होणार सुनावणी

प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती आणि सूचनांवर उद्या गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर आणि शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर या दोन दिवशी यशवंतराव चव्हाण केंद्र येथे सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी मुंबईकरांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार आहे. हे लक्षात घेऊन सुनावणीसाठी पाठवलेल्या सूचना पत्रांप्रमाणे नागरिकांनी सुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.