हिंदुस्थान- पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेना ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन करणार; संजय राऊत यांची घोषणा

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि देशातील महिलांचे दहशतवाद्यांनी उजाडलेले सिंदूर एवढ्या लवकर भाजपवाले विसरले? असा सवाल करत शिवसेना हिंदुस्थान- पाकिस्तान सामन्याचा निषेध करत असून याविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. आबुधाबीमध्ये 14 सप्टेंबरला हिंदुस्थान- पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे. त्याविरोधात शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर उतरून ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

14 सप्टेंबरला आबुधाबीमध्ये हिंदुस्थान- पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने या सामन्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा सामना खेळवण्याबाबत जनता सहमत नाही, या सामन्याविरोधात जनमत दिसत आहे. पहलगाम हल्ल्यात ज्या निरपराध 26 जणांचा बळी गेला, त्यांच्या कटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही. हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. ऑपरेशन सिंदूर आजही सुरू असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानच्या कश्मीरमध्ये कुरापती सुरुच आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याची आणि त्यांच्याशी सर्व संबंध तोडण्याची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपमधील अनेक असली-नकली नेत्यांनी केली. सिंधू जलकरार रद्द करण्यात आला. खून और पानी एकसाथ नही बहेगा, असे पंतप्रधान म्हणाले होते. तर आता खून और क्रिकेट एकसाथ कैसे चलेगा? असा आमचा प्रश्न आहे, असे संजय राऊत म्हणाले.

देशातील महिलांचे दहशतवाद्यांनी उजाडलेले सिंदूर एवढ्या लवकर भाजपवाले विसरले? भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यासारख्या भाजपच्या प्रचारक संघटनांनी हिंदुस्थान- पाकिस्तान क्रिकेट सामन्यांबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले. शिवनेनेने याचा निषेध करत सामन्यांना विरोध केला आहे. या दिवशी शिवसेनेची महिला आघाडी रस्त्यावर उतरून माझं कुंकू माझा देश हे सिंदूरशी संबंधित आंदोलन करणार आहे. सिंदूर की रक्षा में शिवसेना मैदान में असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर घराघरातून पंतप्रधान मोदी यांना सिंदूर पाठवण्यात येणार आहेत. पंतप्रधान सिंदूर विसरले आहेत. ते घराघरात सिंदूर पाठवून राजकारण करणार होते. त्याला विरोध झाल्यामुळे त्यांनी ते केले नाही. आता त्यांनाच घराघरातून सिंदूर पाठवण्यात येणार आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत याबाबत सूचना केल्या आहेत. त्यांच्या आदेशानुसार 14 तारखेला हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

हिंदुस्थान- पाकिस्तान सामन्याला पाठिंबा देणाऱ्यांनी किंवा त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आपला अंतरात्मा तपासून पाहावा. याबाबत देशातील जनतेची काय भावना आहे, ते त्यांनी समजून घ्यावे. याला पाठिंबा देणे म्हणजे देशद्रोह आहे. भाजपवाल्यांची मुले आबुधाबीत क्रिकेट सामना बघायला जाणार आहेत.अमित शहा राष्ट्रभक्ती आणि नैतिकतेच्या गोष्टी करतात. त्यांचा मुलगा जय शहा क्रिकेटचा सर्वेसर्वा आहे. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो, असा आरोप भाजपवाले करतात. मात्र, आम्ही मूळ विचारापासून दूर गेलेलो नाही. हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुस्थान- पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना विरोध होता. जावेद मियांदाद घरी आला तेव्हा त्यालाही ठणकावून सांगितले की, चहा प्यायचा आणि निघून जायचे. सामन्यांसाठी काहीही चर्चा होणार नाही. तुमच्या देशाकडून कश्मीरमध्ये रक्त सांडत असताना, आमच्याशी क्रिकेट खेळायला येता, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजपने याचा विरोध करायला हवा. ते याबाबत तोंडही उघडत नाहीत. हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यात मोठी आर्थिक उलाढाल होते. मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी, गँमलिंग चालते, त्याची सूत्रे गुजरातमधून हलतात आणि जुगारात भाजपचे प्रमुख नेते सहभागी असतात, असा आरोपही त्यांनी केला.