
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची बुधवारी भेट झाली. दोन भावांची भेट होते, याचे दरवेळी राजकीय अर्थ लावण्याची गरज नाही. ही भेट राजकीय नसल्याचे आपण याआधीच स्पष्ट केले आहे, तरीही याबाबत अनेक प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये अनेक तर्कवितर्क करण्यात आले आहेत. या बैठकीबाबत वृत्तपत्रांमध्ये आलेल्या सर्व बातम्या खोट्या असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावले.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे भाऊ आहेत. दरवेळी त्यांची भेट ही राजकीय कशी असू शकते. ते दोघे बंधू आहेत. आपले त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते आहे. त्यामुळे ही भेट राजकीय नव्हती, असे आपण स्पष्ट केले आहे. या बैठकीनंतर आज होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीबाबत ते म्हणाले की, पदाधिकाऱ्यांची बैठर ही राजकारणात सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. महानगर पालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या बैठक जवळ आल्या आहेत. त्यामुळे बैठकांचे सत्र सुरूच राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
खोट्या बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांवर आणि पत्रकारांवर नेपाळमध्ये हल्ले झाले आहेत. तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्याची गरज आहे. आपल्याकडील अनेक वृत्तपत्रात कालच्या बैठकीबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात आले आहेत. मात्र, त्या बैठकीत आपण, राज आणि उद्धव ठाकरे होते. त्यामुळे आतमध्ये काय चर्चा झाली? आतमध्ये काय झाले, हे कोणाला कसे माहिती असणार? असा सवाल करत या बैठकीबाबत वृत्तपत्रांमध्ये आलेल्या सर्व बातम्या खोट्या आहेत, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.