
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात घडली. प्रगती अविनाश पवार असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती, सासू-सासऱ्यांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
22 जुलै 2018 रोजी प्रगतीचा अविनाश उत्तम पवार याच्याशी विवाह झाला. लग्नाच्या चार-पाच महिन्यांनंतरच पती आणि सासू-सासरे पैशासाठी प्रगतीशी भांडण करू लागले. नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 10 लाख रुपये आणण्यासाठी प्रगतीवर दबाव टाकत होते. पैसे न मिळाल्याने पती,सासू-सासरे आणि नणंद प्रगतीला शिवीगाळ आणि मारहाण करत होते. तसेच वांझोटी म्हणून हीनवत असतं.
अखेर या जाचाला कंटाळून प्रगतीने रविवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास बेडरुममध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी पती अविनाश उत्तम पवार, सासरे उत्तम काशिनाथ पवार, सासू वत्सला उत्तम पवार, नणंद कविता रवींद्र देवकर, नणंदेचा पती रवींद्र लक्ष्मण देवकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे 108, 84, 115(2), 352, 351(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे करत आहेत.


























































