मुंबई विमानतळावर 49 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, परकीय चलन आणि वन्यजीव हस्तगत

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने अंमली पदार्थ आणि वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश केला आहे. कस्टम विभागाने केलेल्या विविध कारवाईत 49 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, परकीय चलन आणि जिवंत वन्यजीव हस्तगत केले आहेत. याप्रकरणी एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. 12 ते 15 सप्टेंबर 2025 दरम्यान मुंबई कस्टम्स, झोन-III च्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

पहिल्या कारवाईत, गुप्त माहितीच्या आधारे ताश्कंदहून आलेल्या एका प्रवाशाच्या ट्रॉली बॅगची तपासणी करण्यात आली. तपासणी बॅगेतून 7.118 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत सुमारे 7.1 कोटी रुपये आहे. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या कारवाईत, जेद्दाहला जाणाऱ्या तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे 15.96 लाख रुपयांचे परकीय चलन आढळले. आरोपींनी हे परकीय चलन सामानात लपवून ठेवले होते.

तिसऱ्या कारवाईत गुप्त माहितीच्या आधारे बँकॉकहून येणाऱ्या तीन प्रवाशांकडून करोडोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तिघांनाही NDPS कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.

चौथ्या कारवाईत बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून वन्यजीव जप्त करण्यात आले. प्रवाशाच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यात मेरकॅट्स, हायरॅक्स, शुगर ग्लायडर, दाढीवाले ड्रॅगन, बिबट्या कासव, अल्बिनो रेड-इअर स्लाइडर्स आणि स्किंक्ससह जिवंत प्राणी आढळले, तसेच मृत मोठ्या फिगर-आयड पोपट आढळले. याशिवाय मॉनिटर सरडे आणि हिरव्या बॅसिलिस्क सरड्यांच्या अनेक प्रजाती देखील होत्या. एकूण 60 हून अधिक जिवंत सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी जप्त करण्यात आले. याप्रकरणी प्रवाशाविरोधात सीमाशुल्क कायदा, 1962, वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे.