
फी साठी पैसे दिले नाही म्हणून 24 वर्षाच्या तरुणाने लाकडाने मारहाण करत वडिलांची हत्या केल्याची घटना चाकूरमध्ये घडली. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. देविदास पांचाळ असे मयत वडिलांचे तर अजय पांचाळ असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
चाकूर तालुक्यातील हिंपळनेर येथील अजय पांचाळ हा तरुण स्पर्धा परीक्षेचा तयारी करत होता. परीक्षेची फी भरण्यासाठी तो वडिलांकडे पैसे मागत होता. मात्र वडिलांनी पैसे न दिल्याने त्याला राग अनावर झाला. रागाच्या भरात सोमवारी मध्यरात्री त्याने वडिलांना लाकडाने बेदम मारहाण केली. यात देवीदास पांचाळ गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
देवीदास यांची पत्नी शारदाबाई पांचाळ हिने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अजयविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधरी, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन नमुने घेतले आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक जी. एन. चामले हे करीत आहेत.