मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी बांबूच्या झोळीचा आधार; जव्हारमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

आदिवासीबहुल जव्हार तालुक्यात स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही साधा रस्तादेखील नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी बांबूच्या झोळीचा आधार घ्यावा लागला. जव्हार तालुक्यातील नारनोली पाड्यावर हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली असून ग्रामीण भागात विकासाचे ढोल बडवणाऱ्या सरकारचे पितळ यानिमित्ताने उघडे पडले आहे.

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
जव्हारच्या नारनोली पाडा येथे राहणारे महेंद्र जाधव (४५) यांचा ग्रामीण रुग्णालयात आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह चांभारशेत या गावापर्यंत खासगी रुग्णवाहिकेतून आणला. मात्र पुढे नारनोली पाड्यावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने हा मृतदेह बांबूच्या झोळीचा आधार घेऊन दोन किलोमीटर चालत घरापर्यंत नेण्यात आला. ऐन पावसात चिखलवाट तुडवत ग्रामस्थांना प्रचंड त्रास त्यामुळे सहन करावा लागला. मृतदेहाचे झालेले हाल बघून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

नारनोली पाड्यावर रस्ता करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच रवींद्र पवार आणि पिंपळशेत-खरोंड्याचे सरपंच दिनेश जाधव यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. मात्र निधी नसल्याचे कारण देत सार्वजनिक बांधकाम विभागाने अजूनपर्यंत हा रस्ता केला नाही. दरम्यान लवकरात लवकर रस्त्याची सुविधा द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध आंदोलन छेडू, असा इशारा चांबारशेत गावातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख महेश चौधरी यांनी दिला आहे.