
परतीच्या पावसाने मराठवाड्याला झोडपून काढले आहे. पावसामुळे जनजवीन विस्कळीत झाले आहे. लातूर जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी सरासरी 15.6 मिमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत (132.7 मिमी सरासरी) प्रत्यक्षात 188.8 मिमी पाऊस झाला. 1 जूनपासून आतापर्यंतचा पाऊस अपेक्षित पर्जन्यमानाच्या (657.7 मिमी) तुलनेत 747.3 मिमी म्हणजेच 113.6 टक्के इतका पाऊस झाला. सततच्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढला असून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
लातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरी (जून ते सप्टेंबर) 706.00 मिमीच्या तुलनेत आजतागायत 747.3 मिमी म्हणजेच 105.8 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. निलंगा तालुका, चाकूर तालुका, जळकोट तालुका या ठिकाणी कुणाचा वीज पडून जखमी झाले, कुणाचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला तर कुणाची जनावरे पाण्यात वाहून गेली किंवा वीज पडून मरण पावली.
मांजरा प्रकल्प, निम्न तेरणा प्रकल्प, रेणापूर मध्यम प्रकल्प, व्हटी मध्यम प्रकल्प, तिरू मध्यम प्रकल्प, देवर्जन मध्यम प्रकल्प, साकोळ मध्यम प्रकल्प, घरणी मध्यम प्रकल्प, तावरजा मध्यम प्रकल्प 100 टक्के भरलेले आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण लघु पाटबंधारे प्रकल्प 135 आहेत. मांजरा, तेरणा, रेणा व तिरू नदीवरील बंधाऱ्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आवश्यक पाणीसाठा मेंटेन करून धरणातील अतिरिक्त पाण्याचा आवश्यकतेनुसार वेळोवेळी नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदी, ओढे तुडुंब भरून वाहत असून जिल्ह्यातील 20 मार्गांवरील पुलांवर पाणी आल्याने हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.