माता न तू वैरिणी! चिकन मागितले म्हणून आईने लाटण्याने बेदम मारले, सात वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पालघर जिल्ह्यातील धनसार येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. सात वर्षाच्या मुलाने चिकन मागितल्याने आईचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात आईने लाटण्याने केलेल्या बेदम मारहाणीत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पालघर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मातेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघरमधील धनसार येथील काशीपाडा परिसरात एका सोसायटीत ही महिला दोन मुलं आणि बहिणींसह राहते. महिला पतीपासून विभक्त राहत असून तिला 10 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा आहे. मुलाने चिकन खायचा हट्ट केल्याने महिला संतापली. तिने लाटण्याने मुलाला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने मुलाचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. महिलेला अटक केली असून मारहाणीसाठी वापरलेले लाटणेही पोलिसांनी जप्त केले आहे. घटना उघड होताच परिसरात खळबळ उडाली.