लोकलमधून फेकलेला नारळ डोक्यात आदळला; तरुणाचा मृत्यू

एका बेशिस्त प्रवाशाने लोकलमधून प्रवास करताना भाईंदर पुलावरून खाडीच्या दिशेने फेकलेल्या निर्माल्यातील नारळाने निरपराध तरुणाचा बळी घेतला. धावत्या लोकलमधून फेकलेला नारळ तरुणाच्या डोक्यावर आदळला. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संजय भोईर (25) असे या तरुणाचे नाव आहे. संजय भोईर हा नायगाव आणि भाईंदर खाडी बेटावर असलेल्या पाणजू बेटावर राहतो. तो गोरेगावातील खासगी कंपनीत नोकरीला आहे. शनिवारी फेरीबोट विलंबाने असल्याने तो नायगाव-भाईंदर रेल्वे खाडीपुलावरून घरी पायी निघाला होता. याचदरम्यान ही घटना घडली.

पाणजू ते नायगाव धोक्याचा प्रवास

नायगाव व भाईंदर खाडीच्या बेटावर पाणजू हे गाव आहे. या भागातील नागरिकांना पाणजू बंदर ते नायगाव बंदर असा बोटीने प्रवास करावा लागतो. काही कारणाने बोट सेवा बंद झाल्यानंतर नागरिकांना या रेल्वे उड्डाणपुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकल्यामुळे आतापर्यंत गावातील 10 ते 12 नागरिक जखमी झाले आहेत. काही वर्षांपूर्वी संजय यांच्या आईवडिलांचा बोट उलटून मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थ विलास भोईर यांनी दिली. संजय याच्या पश्चात भाऊ कृणाल आहे.