
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दानत आणि नियत होती म्हणूनच रिक्षावाले आमदार, मंत्री झाले. कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला, अशा घणाघात करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांची सालटी काढली. ते मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विधानांचाही समाचार घेतला.
एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राममनोहर लोहिया नाहीत किंवा नाथपै नाही. शिंदे हे अमित शहांचे बेनामी कंपनीचे ब्युरो चिफ आहेत. उद्या जेव्हा सरकार जाईल तेव्हा सगळ्या चौकश्या होतील. त्यामुळे मराठी माणूस शिवसेनेमुळे हद्दपार झाला, ठाकरेंमुळे हद्दपार झाला, अशा प्रकारचे वक्तव्य एखाद्याने केले असेल तर त्याने आधी स्वत:ला आरशात बघावे. शिवसेनेमुळे जे तुमच्याबरोबरचे आमदार आहेत पळून गेले त्यांची किंमत 50-100 कोटी झाली. सूरतला कोण पळून गेले?गुवाहाटीला कोण पळून गेले? हे पळपुटे आहेत. काहीही बोलायचे, लिहून दिलेली भाषणे वाचायची, असा घणाघात राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, मुंबईतला, ठाण्यातला आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस आजही एका श्रद्धेने, निष्ठेने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाबरोबरच आहे. मुंबईतला मराठीतला माणूस हद्दपार करण्याचा विडा ज्या शहांनी उचलला आहे आणि मुंबई गौतम अदानी सारख्या उद्योगपतींना विकण्याचा चंग ज्या शहा आणि त्यांच्या लोकांनी बांधला आहे, त्या शहांच्या कंपनीचे शिंदे हे जोडेपुसे आहेत. शहांनी मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचे जे राजकारण सुरू केले आहे, त्याचा निषेध करण्याची हिंमत शिंदेमध्ये आहे का? नसेल तर त्यांनी मराठी माणसा विषयी बोलू नये. मराठी माणसाला भ्रष्टाचाराच्या पैशातून विकत घेण्याचे प्रयत्न चालू केले आहे. पण हे तात्पुरते आहे. त्यांची इतिहासात काळ्या कुट्ट अक्षरात नोंद होईल. मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचे कारस्थान शहांनी सुरू केले आणि शहांच्या हातात कुऱ्हाड देण्याचे काम शिंदेंनी केले.
उद्धव ठाकरे यांनीच शिंदेंना नेते केले. बाळासाहेबांनी त्यांना नेते केले नव्हते. बाळासाहेबांनी नेते केलेले मोजके लोक आहेत आणि त्यातील मी एक आहे. मला राजकारण माहिती आहे. बाकी सगळ्यांना उद्धव ठाकरे यांनी मोठ्या दिलाने आणि दयावान बुद्धीने नेता केले. हातामध्ये सत्ता दिली, नगरविकास मंत्री केले. मग ते कटप्रमुख कसे? तुम्ही म्हणता ना मी रिक्षावाला आहे, मग तुमच्या सारखा रिक्षावाला आज 5 लाख कोटींचा मालक झाला. तुमच्या सारखा रिक्षावाला निवडणुकीवर एकाचवेळी 50-100 कोटी उधळतो, हे उद्धव ठाकरे यांच्यामुळेच शक्य आहे ना. नाही तर तुम्ही कोण होतात? याचे आत्मचिंतन त्यांनी केले पाहिजे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या मेमोरियलमध्ये जाऊन त्यांनी बसावे, आत्मचिंतन करावे आणि मी काय होते, कुणामुळे या पदावर आहे याचा विचार करावा, असा टोला राऊत यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांच्याकडे दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री, आमदार झाले. दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला. त्यांचे सर्टिफिकिट बघा, मोदी मागे पडतील. उद्धव ठाकरे यांची दानत आणि नियत यामुळे हे सगळे शक्य झाले. पण हे शिंदे गटाचे सगळे नेते शहांच्या पादुकांचे पाद्यपूजन करतात. त्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला आहे, अशी टीका राऊत यांनी केली.