Ahilyanagar news – पंचनाम्यासाठी गेलेल्या तलाठ्यास सर्पदंश, गवतात लपलेल्या सापावर पाय पडला अन्… जामखेडमधील घटना

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार उडवून दिला. पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने उभी पिके पाण्यात गेली, रस्ते वाहून गेले, शेताचे तळे झाले. नुकसान मोठे असल्याने महसूल विभागातर्फे पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले असून गावागावात तलाठी, ग्रामसेवक यांची धावपळ सुरू आहे. अशातच पंचनामे सुरू असताना तलाठ्याला सर्पदंश झाल्याची घटना गुरुवारी सकाळी जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे घडली. गावकऱ्यांनी समय सूचकता दाखवत तलाठ्याला उचलून दवाखान्यात नेले आणि त्याचा जीव वाचवला.

धनेगाव परिसरात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी गेलेली तलाठी आकाश काशिकेदार यांना सर्पदंश झाला. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तातडीने जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

नक्की काय घडलं?

मागील 15 दिवसांपासून जामखेड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत. ग्रामसेवक व तलाठी हे पंचनामे करण्याचे काम करीत आहेत. गुरुवारी धनेगाव परिसरात तलाठी आकाश काशिकेदार हे नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे करीत होते. याच दरम्यान गवतात लपलेल्या सापावर तलाठ्याचा पाय पडला आणि सापाने दंश केला. यामुळे त्यांना चक्कर येऊ लागली. ही घटना त्यांच्या सोबत असलेल्या शेतकर्‍यांच्या लक्षात आली. त्यांना तातडीने शेतातून उचलून जवळील वस्तीवर आणण्यात आले व चारचाकी वाहनाने जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्आत आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते.