
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना आज अखेर जाहीर करण्यात आली. या प्रभाग रचनेला सरकारने हिरवा कंदील दाखवला असून चार प्रभागांची व्याप्ती व सीमांकनामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा झाला असून इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान २७ गावांच्या मागणीवर अद्याप तोडगा न निघाल्याने ऐन निवडणुकीच्या काळात संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली असली तरी २७ गावे पालि केतून वगळावीत, या संघर्ष समितीच्या मागणीचा प्रश्न अद्यापही अनुत्तरित राहिला आहे. आगामी निवडणुकीत १२२ सदस्य निवडण्यासाठी चार सदस्यीय पॅनल पद्धती राबविण्यात येणार आहे. त्यानुसार २९ पॅनल हे चार, तर दोन पॅनल तीन सदस्यांचे अशा एकूण ३१ पॅनलची रचना करण्यात आली आहे.
आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा; २९ पॅनल चार, तर दोन पॅनल तीन सदस्यांचे
- प्रारूप प्रभाग रचना ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात आली होती. यावर विविध पक्ष, संस्था व इच्छुक उमेदवारांकडून एकूण २६४ हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या.
- प्रभागांच्या सीमांकनासंदर्भात तब्बल २१४ हरकती नोंदल्या गेल्या. काही ठिकाणी शेजारील इमारती दुसऱ्या प्रभागाला जोडल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
- ४६ सर्वसाधारण हरकती व काही आरक्ष-णाशी संबंधित मुद्दे होते. सुनावणी केल्यानंतर त्यातील फक्त चार प्रभागांच्या सीमांकनात बदल करण्यात आला असून उर्वरित हरकती फेटाळण्यात आल्या.
नकाशे संकेतस्थळावर दिसणार
राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर अंतिम प्रभाग रचनेचे नकाशे तसेच परिशिष्ट १४ व १५ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे नकाशे केडीएमसीच्या संकेतस्थळावर प्रकाशित होणार आहेत. पालिका मुख्यालय व सर्व प्रभाग क्षेत्र कार्यालयांमध्येदेखील नागरिकांना हे नकाशे पाहता येणार आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिली.