भाजपचा असा सेवा पंधरवडा! रुग्णाला बिस्कीटचा पुडा दिला, फोटो काढला आणि परत घेतला, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राजस्थानची राजधानी जयपूर येथील रुग्णालयात फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णाला दिलेला बिस्कीटचा पुडा फोटो काढून झाल्यावर परत घेतला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या या लाजीरवाण्या कृतीमुळे जोरदार टीका होत आहे.

जयपूर येथील आरयूएचएससी एमएस रुग्णालयातील भाजपचा सेवा पंधरवडा भाजप कार्यकर्त्यांच्या लाजीरवाण्या कृतीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा ज्या मतदारसंघातून निवडून आले, त्या सांगानेर मतदारसंघातील कर्करोग रुग्णालयात भाजप पदाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी रुग्णांना बिस्कीट व फळवाटपाचे आयोजन केले होते. यादरम्यान भाजपची एक महिला कार्यकर्ती रुग्णाला दिलेला दहा रुपये किमतीचा बिस्कीटचा पुडा फोटो काढल्यावर परत घेऊन तो पिशवीत ठेवताना दिसत आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भाजपकडून फक्त दिखाव्यासाठी करण्यात येत असलेल्या या कार्यक्रमावरून सर्वत्र जोरदार टीका होत आहे.

मार्केटिंग स्टंट कशासाठी?

गरीब आणि आजारी असलेल्या लोकांचा फक्त फोटो काढून घेण्यासाठी भाजपकडून वापर करण्यात येत आहे. १००-२०० रुपयांच्या वस्तू घ्यायच्या आणि त्याच वाटप करून फोटो काढले जातात. रुग्णसेवेच्या नावाखाली हा मार्केटिंग स्टंट कशासाठी केला जात आहे, असा संताप व्यक्त केला जात आहे.