Mumbai news – लोकलच्या गर्दीनं घेतला आणखी एक बळी; दारात उभ्या जवानाला धक्काबुक्की, रुळावर पडल्यानं मृत्यू

मुंबईची ‘लाईफलाईन’ समजली जाणारी लोकल ‘जीवघेणी’ ठरत असून लोकलमधील गर्दीने आणखी एक बळी घेतला आहे. शुक्रवारी गर्दीच्या रेट्यामुळे धावत्या लोकलमधून पडून महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान गणेश रमेश जगदाळे (वय – 31) यांचा मृत्यू झाला. ते दहिसर शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गणेश जगदाळे हे दहिसर शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास त्यांनी ड्युटी संपवून दहिसर स्थानकातून नायगावला जाण्यासाठी लोकल पकडली. मात्र प्राईम टाईम असल्याने लोकलला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे ते दरवाजा जवळ उभे होते. याच दरम्यान मालाड ते गोरेगाव दरम्यान त्यांना धक्काबुक्की झाली आणि ते धावत्या लोकलमधून रुळावर पडले.

लोकलमधून पडल्याने गणेश जगदाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रेल्वे पोलिसांनी त्यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गणेवेश आणि ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटवण्यात आली असून या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

लोकलमधून फेकलेला नारळ डोक्यात आदळला; तरुणाचा मृत्यू

लोकलची गर्दी ठरतेय जीवघेणी

माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी अपघाती बळींची आकडेवारी मागवली होती. त्यांच्या अर्जावर प्रशासनाने दिलेल्या उत्तरानुसार, 1 जानेवारी ते 31 मे या कालावधीत 922 प्रवाशांना प्राणाला मुकावे लागले. त्यात 210 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला, तर उर्वरित प्रवाशांचा रूळ ओलांडणे वा अन्य प्रकारच्या अपघातांमध्ये मृत्यू झाल्याचे मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाने कळवले आहे.