
>> रंगनाथ कोकणे
इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार वेगाने वाढत असला तरी बॅटऱ्यांमध्ये आपण पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहोत. जवळ जवळ प्रत्येक विद्युत वाहनामध्ये चीनची बॅटरी आहे, पण भारत या क्षेत्रात आता वेगाने पुढे येत आहे. अलीकडेच राजस्थानच्या नागौर जिह्यातील डेगाना भागातील रेवंत पर्वतात अंदाजे 14 मिलियन टन लिथियमचे भांडार सापडले आहे. हा लिथियमचा मोठा खजिना फक्त राज्यासाठी नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी क्रांतिकारी ठरू शकतो. मोबाइल, लॅपटॉप, इलेट्रिक वाहने आणि रिचार्जेबल बॅटऱयांसाठी महत्त्वाचा असणारे लिथियम आता देशात उपलब्ध होणार असल्यामुळे चीनवर असलेले आयातावरील अवलंबित्व संपुष्टात येईल, असे मानले जाते.
जागतिक अर्थकारण आणि राजकारणामध्ये अलीकडील काळात रेअर अर्थ मिनरल्स म्हणजेच दुर्मिळ खनिजांचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. चीनने तर या खनिज साठय़ांच्या जोरावर अमेरिकेसारख्या महासत्तेची आणि त्यांच्या हेकेखोर राष्ट्राध्यक्षांची मस्ती जिरवल्याचे गेल्या महिन्यात आपण पाहिले. याचे कारण ही खनिजे विविध उद्योगांचा पायाभूत आधार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातील राजस्थानमध्ये अलीकडेच सापडलेल्या लिथियमच्या साठय़ाकडे पाहावे लागेल. आजघडीला बोलिव्हियामध्ये 21 दशलक्ष टन लिथियमचा साठा आहे. याखेरीज अर्जेंटिनामध्ये 17 दशलक्ष टन, ऑस्ट्रेलियामध्ये 6.3 दशलक्ष टन आणि त्याच्या शेजारी चीनमध्ये 4.5 दशलक्ष टन लिथियमचा साठा आहे.
मुळात एकविसाव्या शतकात बॅटरींना तेलाइतके महत्त्वाचे स्थान लाभले आहे. या नवीन खेळात चीनने बाजी मारली आहे. माइनिंगपासून रिफायनिंग, बॅटरी उत्पादनापासून इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत चीनने दशकांपूर्वीची योजना, सबसिडी आणि उत्कृष्ट अंमलबजावणी यांचा उपयोग करून लिथियमची अशी पुरवठा साखळी तयार केली आहे की, इतर कोणताही देश त्याची स्पर्धा करू शकत नाही. 2026 पर्यंत चीन ऑस्ट्रेलियाला मागे टाकून जगाचा सर्वात मोठा लिथियम उत्पादक होणार आहे. ऑस्ट्रेलियाजवळ जरी जास्त साठे असले तरी चीनने लॅटिन अमेरिकेमधील लिथियम ट्रायंगल आणि आफ्रिकेतील मिनरल बेल्टमध्ये मोठी गुंतवणूक करून आपली पुरवठा साखळी सुनिश्चित केली आहे. चीनची खरी कमाई रिफायनिंगमधून होते. जगातील सुमारे 70 टक्के बॅटरी ग्रेड लिथियम चीनमध्ये शुद्धीकरण केले जाते. या रासायनिक प्रक्रियेच्या स्टेजमध्ये सर्वात जास्त मूल्य निर्माण होते. चीनचा बॅटरी उद्योग जगातील सर्वात मोठा आहे. 2024 मध्ये चीनने 1,170 जीडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटऱया तयार केल्या होत्या आणि तो जागतिक उत्पादनाचा सुमारे तीन चतुर्थांश भाग होता.
लिथियम हे पर्यावरणपूरक पद्धतीने जीवनाला अनुकूल बनवण्यास उपयुक्त असल्याने अलीकडील काळात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले आहे. याचे कारण आज संपूर्ण जग जीवाश्म इंधनाला पर्यायाच्या शोधासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, मिथेन, हायड्रोजन, इतकेच नव्हे तर समुद्राचे पाणी यांसारख्या अनेकविध पर्यायांचा इंधनासाठी वापर करून पाहिला जात आहे. या प्रयत्नांमधून तूर्त तरी विद्युत ऊर्जेचा इंधन म्हणून वापर केला गेल्यास तो अधिक प्रभावी आणि व्यवहार्य ठरतो असे दिसून आले आहे. विशेषत दळणवळणाच्या क्षेत्रात वाहनांसाठी विद्युत ऊर्जेचा वापर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून त्याचे सकारात्मक फायदे समोर येताहेत. आज भारतात इलेक्ट्रिक कार, दुचाकी, बसेस यांची संख्या वेगाने वाढत आहे. येत्या काळात देशातील पेट्रोल व डिझेलवर चालणाऱया बहुतांश वाहनांच्या जागी विद्युत वाहने धावताना दिसू शकतात, असे सध्याचे वातावरण आहे.
विद्युत वाहनांमध्ये ही ऊर्जा तयार करण्यासाठी ज्या बॅटरीचा वापर केला जातो, त्यामध्ये लिथियम हा महत्त्वाचा घटक असतो. याखेरीज मोबाइल, सोलार पॅनलमध्ये लिथियम धातूचा वापर अनिवार्य आहे. लिथियम आयन बॅटरीशिवाय या वस्तू तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळेच लिथियम-आयन बॅटरी बनवणाऱया व्यक्तीला या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते. आजघडीला भारतात मोठय़ा प्रमाणावर लिथियमची आयात केली जाते. 2020 पासून भारत लिथियम आयातीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. यापैकी 80 टक्के भाग चीनकडून मागवला जातो. आत्मनिर्भर बनण्यासाठी अर्जेंटिना, चिली, ऑस्ट्रेलिया, बोलिव्हिया आदी देशांकडून लिथियम खरेदी करण्याचा भारताचा विचार आहे. अनेकांना हे माहीत नसेल की, युक्रेन आणि रशिया युद्धाच्या कारणांपैकी लिथियम हे एक महत्त्वाचे कारण होते. कारण युक्रेनच्या जमिनीत व्हाइट गोल्ड अर्थात लिथियमच्या खाणी विपुल प्रमाणात आहेत. तेथील लिथियमचा योग्य वापर झाला तर युक्रेन हा लिथियम निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनू शकतो, असे सांगितले जाते. भारतात अलीकडील काळात लिथियमची गरज वाढत असली तरी इतर देशांवरच अवलंबून राहावे लागत होते.
लिथियमला व्हाईट गोल्ड म्हणून ओळखले जाते. हा हलका, चांदीसारखा चमकदार, नरम आणि अतिशय प्रतिक्रियाशील धातू आहे. हवेमध्ये ऑसिजनच्या संपर्कात आल्यास लिथियम लगेचच जळू शकते. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन आणि सुरक्षितता महत्त्वाची ठरते. नागौरच्या रेवंत पर्वतात सापडलेला लिथियमचा खजिना भारताच्या संपूर्ण मागणीच्या सुमारे 80 टक्के भागापर्यंत पुरवठा करू शकतो. या शोधामुळे भारताने स्वदेशी उत्पादनाच्या दिशेने एक मोठा टप्पा गाठला आहे. केंद्रीय खाणोद्योग मंत्रालयाने यासाठीची लिलाव प्रक्रिया सुरू केली असून दस्तावेज जमा करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2025 ठरवली आहे. या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष उत्खनन सुरू होणार आहे. यातून राजस्थानचा महसूल वाढण्याबरोबरच रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.
मागील काळात देशातील इतर भागांतही लिथियमचे भांडार सापडले आहेत. जम्मू-कश्मीरच्या रियासी जिह्यातील सलाल-हैमाना क्षेत्रात 5.9 मिलियन टन व छत्तीसगडच्या कोरबा, कर्नाटकच्या मांडय़ा जिह्यात 14,100 टन साठा सापडला होता. तसेच बिहार, ओडिशा, झारखंड, तामीळनाडू, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्येही लिथियमचे साठे असण्याची शक्यता आहे, परंतु या राज्यात आतापर्यंत कुठेही खनन सुरू झालेले नाही. यामुळे भारताला भविष्यातील लिथियम पुरवठय़ासाठी स्वावलंबी बनण्याची संधी आहे.
लिथियमचे साठे हे फक्त उद्योगांच्या वाढीसाठी नव्हे, तर देशाच्या रणनीतीक आणि आर्थिक हितासाठीही महत्त्वाचे ठरणार आहेत. चीन या घटकाच्या जोरावर जागतिक बाजारात एकछत्र राजवटीने वर्चस्व ठेवून आहे. भारताला चीनवर अवलंबित्व कमी करण्याची आवश्यकता होती आणि नागौरमधील लिथियमच्या सापडण्यामुळे ही आवश्यकता पूर्ण होऊ शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. लिथियमच्या स्वदेशी उत्पादनामुळे इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी उद्योग, ऊर्जा क्षेत्र आणि नवउद्योगांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.
जगात आतापर्यंत ज्या देशांमध्ये लिथियम मोठय़ा प्रमाणात सापडले आहे, त्या देशांमध्ये खाणकामामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय संकटाविरुद्ध जनक्षोभ वाढला आहे. तेथे खनिज संपत्तीचे लोकशाहीकरण आणि लोकसहभागाची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात उद्याच्या भविष्यात खाणकामामुळे स्थानिक लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ नये आणि त्याचबरोबर पर्यावरणावर होणारे परिणाम कमीत कमी राहतील यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लिथियमच्या शुद्धीकरणासाठी मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गरज असते, हेही विसरता कामा नये. फ्रेंड्स ऑफ द अर्थ (एफओई) च्या अहवालानुसार, एक टन लिथियम तयार करण्यासाठी सुमारे 2.2 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे अर्थव्यवस्था आणि परिसंस्था या दोन्हींच्या विचारातून याकडे पाहिले पाहिजे. जगातील सर्वात जास्त लिथियमचा साठा असलेल्या चिली या देशात लिथियमच्या खाणकामामुळे पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. कोणत्याही प्रकारचे खाणकाम पर्यावरणासाठी हानिकारक असते, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. कारण ते पाणी, माती, हवा प्रदूषित करते. परिसंस्थेवर परिणाम होतो, परंतु खाणकोळसा किंवा इतर जीवाश्म इंधनांच्या तुलनेत लिथियम उत्खनन फायदेशीर म्हणावे लागेल. कारण ते पुनर्वापर उर्जेच्या श्रेणीत येते. म्हणजेच एकदा लिथियम काढून त्याची बॅटरी बनवली की, ती चार्ज करून पुनः पुन्हा वापरता येते. त्यामुळेच लिथियमचे साठे हा भारतासाठी जॅकपॉट म्हणावा लागेल.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे लिथियमची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील ईव्ही उद्योगाला पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी स्वदेशी लिथियमचा वापर महत्त्वाचा ठरतो. याशिवाय लिथियमवर आधारित बॅटरी तंत्रज्ञानाच्या संशोधनालाही यामुळे चालना मिळणार आहे. यामुळे भारतात नवउद्योग आणि संशोधन केंद्रांचा विकास होऊ शकतो.
संपूर्ण जग सध्या जीवाश्म इंधनाला पर्यायाच्या शोधासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, मिथेन, हायड्रोजन, इतकेच नव्हे तर समुद्राचे पाणी यांसारख्या पर्यायांचा इंधनासाठी वापर करून पाहिला जात आहे. विद्युत वाहनांमध्ये ही ऊर्जा तयार करण्यासाठी ज्या बॅटरीचा वापर केला जातो, त्यामध्ये लिथियम हा महत्त्वाचा घटक असतो. याखेरीज मोबाइल, सोलार पॅनलमध्ये लिथियम धातूचा वापर अनिवार्य आहे. लिथियम आयन बॅटरीशिवाय या वस्तू तयार होऊ शकत नाही. या क्षेत्रात चीनचा दबदबा आहे, पण भारतात अलीकडेच राजस्थानमध्ये सापडलेल्या लिथियमच्या साठय़ांमुळे एक मोठे परिवर्तन घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत)