IND vs WI Test – शतकानंतर जडेजाचा गोलंदाजीत ‘चौकार’, अहमदाबाद कसोटीत हिंदुस्थानचा डावानं विजय

अहमदाबाद कसोटीत शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हिंदुस्थानने पाहुण्या वेस्ट इंडिजचा डावाने पराभव केला आहे. नरेंद्र मोदी मैदानात झालेली लढत अवघ्या अडीच दिवसांमध्ये आटोपली. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर हिंदुस्थानने विंडीजचा दुसरा डाव 146 धावांमध्ये गुंडाळत एक डाव आणि 140 धावांनी मोठा विजय मिळवला. पहिल्या डावात शतकी खेळी करत गोलंदाजी चार बळी घेणाऱ्या जडेजाला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, ही कसोटी जिंकत हिंदुस्थानने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून दुसरा कसोटी सामना 10 ऑक्टोबर पासून दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर रंगणार आहे.

हिंदुस्थानने आपला पहिला डाव 5 बाद 448 धावांवर घोषित केला. केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजाने शतकी, तर कर्णधार शुभमन गिल याने अर्धशतकीय खेळी करत संघाला मोठी धावसंख्या रचून दिली. वेस्ट इंडिजला डावाने पराभव टाळण्यासाठी 287 धावांची आवश्यकता होती, मात्र त्यांचा दुसरा डाव 146 धावांमध्ये आटोपला. रवींद्र जडेजाने 4, मोहम्मद सिराजने 3, कुलदीप यादवने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने 1 विकेट घेतली. पहिल्या डावा प्रमाणे दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजचा एकही फलंदाज 50 धावांचा आकडाही पार करू शकला नाही.