
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना आज पालिका प्रशासनाने जाहीर केली. प्रारूप प्रभाग रचनेत आणि या अंतिम प्रभाग रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रभाग रचनेवर घेण्यात आलेल्या सूचना आणि हरकतींना केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या प्रभाग रचनेवर शहरातून २७० हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यावर निवडणूक आयोगाने सुनावणीही घेतली होती. मात्र हरकतींची कोणतीही दखल अंतिम प्रभाग रचना जाहीर करताना घेण्यात आली नसल्याने ही सुनावणी फक्त फार्स ठरल्याची प्रतिक्रिया आता शहरातून उमटू लागली आहे.
ठाणे महापालिकेची आगामी निवडणूक आता चार सदस्यीय प्रभागातून होणार आहेत. त्यासाठी शहरात एकूण ३३ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यामधून १३१ नगरसेवक महापालिकेच्या महासभेत निवडून जाणार आहेत. ही प्रभाग रचना करताना अनेक ठिकाणी भौगोलिक निकष पालिका प्रशासनाने पाळले नाहीत. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रारूप प्रभाग रचनेवर २७० हरकती घेतल्या होत्या. या सूचना आणि हरकतींवर निवडणूक आयोगाने सुनावणीही घेतली होती. मात्र अंतिम प्रभाग रचना जाहीर करताना प्रारूप प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे.
सुनावणीचे फक्त नाटक
प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना आणि हरकतींचा पाऊस पडला होता. मात्र प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून झाल्याने तिच्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. निवडणूक आयोगाने फक्त नाटक केले आहे, असा आरोप शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे.
सत्ताधाऱ्यांनी सोयीनुसार प्रभाग रचना केली आहे. हरकतींवर कुठेही विचार करण्यात आला नाही. मनमानी कायम ठेवण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे.
लोकशाही नाही ठोकशाही
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना ही मनमानी पद्धतीने तयार करण्यात आली आहे. दिवा आणि मुंब्रा परिसरातील अनेक प्रभाग मनमानी पद्धतीने तोडण्यात आले आहे. प्रभागांमध्ये लोकसंख्येचा समतोल राखण्यात आलेला नाही. प्रभाग रचनेवर घेतलेल्या सूचना आणि हरकतींचा विचार झालेला नाही. ठाण्यात लोकशाही नसून ठोकशाही आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया कल्याण ग्रामीण विधानसभा संपर्कप्रमुख रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केली आहे.