
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणात ईडीने भूमाफियांना चौकशीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. तक्रारदार महेश निंबाळकर यांनी भंडाफोड केल्यानंतर ईडी व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाच्या संयुक्त चौकशीला सुरुवात केली होती. चौकशीदरम्यान ईडीने फार्स आवळल्याने भूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती बांधतांना भूमाफियांनी कर्जासाठी बँक व वित्तीय संस्थांकडून परप्रांतीय मजुरांचे आधारकार्ड, पॅनकार्ड व खोटे पत्ते वापरले. यासाठी ओरिसा, झारखंड व उत्तर प्रदेशातील वाहनचालक, मुकादम, कपबशा धुणारे कामगार यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे व्यवहार दाखवून फसवणूक केल्याचा आरोप तक्रादार महेश निंबाळकर यांनी केला होता. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनीदेखील वर्षभरापासून कठोर कारवाईची मागणी लावून धरली होती. या प्रकरणात नेमका काय तपास केला? असा जाब उच्च न्यायालयाने ईडीला विचारताच ईडीने चौकशीचा फार्स आवळत भूमाफियांनी नोटिसा पाठवल्या आहेत.
भूमाफियांना पोलीस बंदोबस्त
ईडी व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या चौकशीमध्ये राजकीय हस्तक्षेप नसता तर दोषींना आतापर्यंत कठोर शिक्षा झाली असती, परंतु अद्याप या प्रकरणातील प्रमुख भूमाफिया खुलेआम पोलीस बंदोबस्तात फिरताना दिसत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. तपास अधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेऊन चौकशी केली तर खरे म्होरके समोर येतील अशी मागणी तक्रादार महेश निंबाळकर यांनी केली आहे.