चर्चांना पूर्णविराम; अरविंद केजरीवाल राज्यसभेवर जाणार नाहीत, ‘आप’कडून उद्योजक राजिंदर गुप्तांना तिकीट

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीच्या सत्तेतून पायउतार झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पंजाबमधून राज्यसभेवर जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम देत आपने उद्योजक राजिंदर गुप्ता यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राजिंदर गुप्ता यांना आपकडून तिकीट देण्यात आले असून 24 ऑक्टोबर रोजी राज्यसभेच्या खासदारकीसाठी निवडणूक पार पडणार आहे.

राजिंदर गुप्ता हे 5000 कोटींचा टर्नओव्हर असलेल्या ट्रायडंट ग्रुपचे चेअरमन आहेत. संजीव अरोरा यांच्यानंतर त्यांनी कंपनीची सूत्र हाती घेतली होती. ते पंजाबमधील प्रसिष्ठित उद्योजक असून हार्वड विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतलेली आहे. ते पंजाब आर्थिक धोरणे आणि नियोजन मंडळाचे उपाध्यक्षही होते, मात्र राज्यसभेचा अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.