
पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी रात्री लोहगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांना अजित पवार गटाच्या समर्थकांसोबत झालेल्या वादातून धक्काबुक्की केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते यांच्यात वादविवाद झाले होते. त्याये पर्यवसान धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले.
आमदार बापूसाहेब पठारे यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पठारे यांना या हल्ल्यात दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाणी मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे लोहगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजकीय स्टंटबाजी
लोहगावमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आमदार बापूसाहेब पठारे गेले असताना बंडू खांदवे नावाच्या व्यक्तीने उद्या आंदोलन असल्याचे सांगितले. त्याला उत्तर देताना ‘तुला जे आंदोलन करायचे ते करू शकतो‘, असे सांगितले. त्यानंतर तो व्यक्ती आमदारांच्या अंगावर धावून आला. त्याची पार्श्वभूमी आणि राजकीय इतिहास पाहिला तर लक्षात येईल की प्रत्येक निवडणुकीआधी स्टंट करण्याच्या हेतूने गावातील मुलं बोलावून घेतली. आम्ही चार-पाच हजार लोक असतानाही संयमाने घेतले. त्यानंतर राजकीय स्टंटबाजी करत मीडियाला बोलावून घेतले आणि आमदार अंगावर आले असे म्हटले. या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याची माहिती बापूसाहेब पठारे यांच्या मुलाने दिली.
लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देखील सुरक्षित नाहीत
पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना धक्काबुक्की व मारहाण झाली. ही घटना निषेधार्ह आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर हल्ला करतात हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही. आम्ही सर्वजण या घटनेचा कठोर शब्दांत निषेध करतो. आमदार पठारे यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देखील या राज्यात सुरक्षित नाहीत ही मोठी चिंताजनक आणि गृहखात्यासाठी नामुष्कीची बाब आहे, असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
पुण्यामध्ये @NCPspeaks पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना धक्काबुक्की व मारहाण झाली. ही घटना निषेधार्ह आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर हल्ला करतात हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही. आम्ही सर्वजण या घटनेचा कठोर शब्दांत निषेध करतो. आमदार पठारे…
— Supriya Sule (@supriya_sule) October 5, 2025