
हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रो डिसेंबर 2025 मध्ये इतिहास रचणार आहे. इस्रो महिला ह्युमनॉईड रोबोट अंतराळात पाठवणार आहे. त्याचे नाव ‘व्योमित्रा’ आहे. ‘व्योमित्रा’ अंतराळाचा अभ्यास करेल. वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करेल. ह्युमनॉईड म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने माणसासारखा वागू शकणारा रोबोट. ‘व्योमित्रा’ हा हिंदुस्थानचा पहिला ह्युमनॉईड रोबोट आहे, जो इस्रोने मानवी अंतराळ मोहिमांच्या मदतीसाठी विकसित केला आहे. मानवासारखे हावभाव, बोलणे आणि बुद्धी असलेला ‘व्योमित्रा’ हिंदुस्थानच्या गगनयान मोहिमेचा भाग आहे. 2000 सालाच्या सुरुवातीला ‘व्योमित्रा’ रोबोट सर्वांसमोर आणण्यात आला. त्याचे नाव संस्कृत शब्दांवरून ठेवण्यात आले आहे. व्योम म्हणजे अंतराळ आणि मित्रा म्हणजे मित्र. याचाच अर्थ अंतराळाचा मित्र.
ह्युमनॉईड कसे कार्य करते?
ह्युमनॉईड्स हा एक प्रकारचा रोबोट आहे, जो मानवाप्रमाणे फिरू शकतो. मानवी भावदेखील समजू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रोग्रामिंगद्वारे प्रश्नांची उत्तरेदेखील देऊ शकतात. ह्युमनॉईड्समध्ये दोन विशेष भाग असतात, जे त्यांना मानवाप्रमाणे प्रतिक्रिया आणि हालचाल करण्यास मदत करतात.
सेन्सर्स
त्यांच्या मदतीने आपण आजूबाजूचे वातावरण समजतो. कॅमेरा, स्पीकर आणि मायक्रोफोन केवळ सेन्सरद्वारे नियंत्रित केले जातात. ह्युमनॉईड्स त्यांच्या मदतीने पाहू, बोलू आणि ऐकू शकतात.
अॅक्ट्युएटर
ही एक विशेष प्रकारची मोटर आहे, जी माणसाप्रमाणे चालण्यास आणि हात व पायांची हालचाल करण्यास मदत करते. त्याच्या मदतीने ह्युमनॉईड्स सामान्य रोबोटच्या तुलनेत विशेष प्रकारच्या क्रिया करू शकतात.