अलिबाग तालुक्यातील रस्ते गेले खड्यात; 30 कोटींचा निधी खर्च करूनही मार्गांची अवस्था दयनीय

निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे संपूर्ण अलिबाग तालुका खड्ड्यात गेला आहे.तालुक्यातील सर्वच मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून वाहनांचा वेग मंदावला आहे. या रस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजवण्यासाठी आणि रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी प्रशासनाने सुमारे ३० कोटी रुपये खर्च केले आहेत. इतकी मोठी रक्कम खर्च होऊनही रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्यामुळे या कामाचा दर्जा राखला गेला नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे.

अलिबाग-वडखळ, अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरुड, कार्लेखिंड-सारळपूल, कार्लेखिंड-कनकेश्वर फाटा, चौल-आग्राव या मार्गांसह अलिबाग तालुक्यातील इतर सर्वच मार्गांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे मागील दोन वर्षांत खड्डे बुजविण्यासाठी सुमारे ३० कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. खड्डे भरताना ठेकेदार माती-खडीचा वापर करून खड्डे भरतात. संबंधित शासकीय अधिकारी कामाचा दर्जा न तपासता बिल मंजूर करतात. मात्र पुढील काही दिवसात खड्ड्यातील माती व खडी रस्त्यावर येऊन तिथे पुन्हा खड्डा तयार होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पेझारीत आज रास्ता रोको
या भोंगळ कारभारविरोधात शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून मंगळवारी शेकापतर्फे प्रशासनाचे खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पेझारी चेकपोस्ट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे ८ ते १० हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आंदोलनामुळे नागरिकांचे काही प्रमाणात हाल होतील. मात्र हे आंदोलन नागरिकांना चांगले रस्ते मिळावेत यासाठी करण्यात येत आहेत असे शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी यावेळी सांगितले.

पर्यटनावर परिणाम
अलिबाग तालुक्यातील किहीम, मांडवा, आवास, रेवदंडा, नागाव, वरसोली, अलिबाग तसेच मुरुड तालुक्यातील काशीद, मुरुड, बोर्ली हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे आहेत. लाखो पर्यटक या पर्यटनस्थळी येतात. पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळत आहे, परंतु खड्डेमय रस्त्यांमुळे पर्यटकांची पर्यटनस्थळांकडे पाठ फिरू लागली आहे. येथील मार्गावरील प्रवास नको रे बाबा अशी परिस्थिती पर्यटकांची झाली आहे. स्थानिकांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होत आहे.