‘१५ जागा मिळाल्या नाहीत तर निवडणूक लढवणार नाही’; भाजपच्या मित्रपक्षाने दिला इशारा

बिहार निवडणुकीच्या तोंडावर एडीएमध्ये सारे काही आलबेल नाही हे आता समोर आले आहे. एनडीएमध्ये जागा वाटपावरून प्रचंड अस्वस्थता असल्याचे संकेत मिळत आहेत. मित्रपक्ष जीतन राम मांझी यांनी भाजपला थेट इशाराच दिला आहे. जर त्यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा (एचएएम) या पक्षाला किमान १५ जागा मिळाल्या नाहीत, तर ते निवडणूक लढवणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

‘आम्ही एनडीएच्या नेत्यांना विनंती करत आहोत कारण आम्हाला अपमानित झाल्यासारखे वाटत आहे. आम्हाला सन्मानपूर्वक जागांची संख्या मिळाली पाहिजे, ज्यामुळे आमच्या पक्षाला ओळख मिळेल. जर आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत, तर आम्ही निवडणूक लढवणार नाही’, असे मांझी यांनी म्हटले आहे.

मात्र , मांझी यांनी आपला पक्ष एनडीएला सोबतच राहील असेही स्पष्ट केले आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मांझी यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधल्याचेही समजते. आम्ही एनडीएला पाठिंबा देऊ, पण निवडणूक लढवणार नाही. मला मुख्यमंत्री बनायचे नाहीये, मला फक्त आमच्या पक्षाला ओळख मिळवून द्यायची आहे’, असे मांझी म्हणाले.

यापूर्वी, बिहार निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत पक्षाची मागणी काय आहे, याचा संकेत देण्यासाठी मांझी यांनी महान कवी रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या ओळींमध्ये बदल करून ’15 गावे’ म्हणजेच 15 जागांची मागणी केली होती.
एनडीए मधील घटक पक्षांनी अजूनही बिहार निवडणुकीसाठी त्यांच्या जागावाटपाची घोषणा केलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 243 जागांपैकी JDU आणि भाजप प्रत्येकी 100 जागांवर निवडणूक लढवू शकतात. चिराग पासवान यांच्या LJP (राम विलास) ला 24, मांझी यांच्या पक्षाला 10 आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाला सुमारे 6 जागा मिळू शकतात. मांझी यांच्या व्यतिरिक्त चिराग पासवान देखील या आकड्यावर नाराज असून ते किमान 40 जागांसाठी जोर देत आहेत.